जळगाव (प्रतिनिधी) शहर मनपात मोठे फेरबदल झाले असून भाजपच्या फुटीर नगरसेवकांनी स्वबळावर पक्षबैठक घेत विद्यमान गटनेते भगत बालाणी व उपगटनेते राजेंद्र पाटील यांची हकालपट्टी करीत स्वतःच्या गटाच्या सदस्यांची नेमणूक केली आहे. सभागृहनेते ललित कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीत गटनेतेपदी दिलीप पोकळे व उपगटनेते चेतन सनकत यांची नियुक्ती केल्याचे पत्र उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली इतर सदस्यांनी महापौर जयश्री महाजन यांना मान्यतेसाठी दिले आहे.
जळगाव मनपात गेल्या काही महिन्यांपासून अनेक घडामोडी घडत असून भाजपातील फुटीर नगरसेवकांनी अजून एक धक्कातंत्र खेळले आहे. भाजपचे गटनेते ललित कोल्हे यांच्या सूचनेनुसार दि. १७ जून रोजी पक्षाची बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीला उपस्थित २९ नगरसेवकांच्या सर्वानुमते भगत बालाणी व राजेंद्र पाटील यांच्या ऐवजी गटनेते म्हणून दिलीप पोकळे आणि उपगटनेतेपदी चेतन सनकत यांची निवड करण्यात आली.
बैठकीची आणि निर्णयाची नोंद प्रोसेडिंग बुकमध्ये करण्यात आली असून तसे पत्र उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महापौर जयश्री महाजन यांना देण्यात आले आहे. पत्र विभागीय आयुक्तांना देखील पाठविण्यात येणार आहे. महापौर जयश्री महाजन यांना पत्र देताना उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह नगरसेवक नवनाथ दारकुंडे, ऍड. दिलीप पोकळे, चेतन संकत, गजानन देशमुख, कुंदन काळे, गोकुळ पाटील, किशोर बाविस्कर, उमेश सोनवणे आदींची उपस्थिती होती.