मुंबई (प्रतिनिधी) भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे हेच मुख्य सूत्रधार असल्याचा दावा सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने आरोपत्रातून केला आहे.
ईडीच्या आरोपपत्रात नेमकं काय नमूद
एका इंग्रजी वृत्तानुसार ईडीच्या आरोपपत्रात म्हटले आहे की, एकनाथराव खडसे यांनी आपल्या पत्नीला ५० लाख रूपये त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले. यातील ३८ लाख रूपये त्यांनी भोसरी येथील तो वादग्रस्त भूखंड खरेदी करण्यासाठी उपयोगात आणले. हा भूखंड ३ कोटी ७५ लाख रूपयांना खरेदी करण्यात आला असून यावर १ कोटी ७८ लाख रूपयांचे मुद्रांक शुल्क अदा करण्यात आले आहे. अशा प्रकारे हा पूर्ण सौदा ५ कोटी ५३ लाख रूपयांचा असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. यातील २ कोटी ३८ लाख रूपये हे मंदाकिनी खडसे यांनी तर ३ कोटी १५ लाख रूपये हे गिरीश दयाराम चौधरी यांनी भरलेत. मंदाकिनी खडसे यांना बेंचमार्क बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दोन कोटी रूपयांचे कर्ज दिले. ही कंपनी शेल कंपनी या प्रकारातील असून त्यांनी अनसिक्युअर्ड लोन या प्रकारातील कर्ज मंदाताई खडसे यांना दिलेत. तर त्यांचे पती एकनाथराव खडसे यांनी दिलेल्या ५० लाख रूपयांमधून त्यांनी ३८ लाख रूपयांचा वापर या जमीन खरेदीसाठी केला.
गिरीश दयाराम चौधरी यांना देखील बेंचमार्क बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने चार कोटी रूपयांचे लोन दिले. यासाठी चौधरी यांनी बॅक-डेटेड या प्रकारातील डॉक्युमेंट संबंधीत कंपनीला दिले आहे. यातीलच ३ कोटी १५ लाख रूपयांचा वापर त्यांनी भोसरी येथील भूखंडाच्या खरेदीसाठी केला. यासाठी ज्या कंपनीकडून पैसे कर्ज घेतले ती बेचमार्क बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड ही शेल कंपनी असल्याचे ईडीने आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.
दरम्यान, नवीन भूसंपादन कायद्याच्या दरानुसार मोबदला मिळावा हा हेतू असून यासाठी एकनाथराव खडसे यांनी थेट मदत केली असून तेच याचे सूत्रधार असल्याचा दावा ईडीने आपल्या आरोपपत्रामध्ये केला आहे. तर तत्कालीन स्थानिक उपनिबंधक रवींद्र मुळे यांच्यावर देखील आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
















