जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या तिघां संशयित आरोपींन न्यायालयात हजर केले होते. यातील अंबादास आबाजी मानकापे ( रा. औरंगाबाद) याचा गुन्हयातील सहभाग कसा आहे?, याबाबत पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार मानकापेने अवसायकासोबत संगनमत करून कर्जफेड केल्याच्या खोट्या नोंदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड नोटनुसार अंबादास आबाजी मानकापे (रा. प्लॉट नं. ३१ शिवज्योती कॉलनी एन-६ सिडको औरंगाबाद व प्लॉट नं. ३१८२ आदर्श बँकेच्यावर शिवाजी सोसायटी सिडको, औरंगाबाद) चा गुन्ह्यातील सहभाग मोठा आहे. सदर आरोपी याने बीएचआर पतसंस्था औरंगाबाद शाखा येथे त्यांचे नावे असलेले कर्ज खाते क्र. ००३२०७००२९० मधील एकूण बाकी कर्ज रक्कम रुपये ३,३१,१६,६३८/- यापैकी रुपये २,७१,१६,६३८ /- हि रक्कम वेगवेगळ्या ठेवीदारांच्या ठेवी कमीत किमतीत घेऊन पूर्ण पैसे परतफेड करण्यासाठी वापर केला आहे. असे करताना त्याने स्वतः ठेवीदारांना सक्षम भेटून पैसे हवे असतील तर पावत्या माझ्याकडे जमा करा, मी माझ्या सोयीने ३० टक्के रक्कम तुम्हाला देईल, त्याप्रमाणे तुम्हाला पैसे मिळाल्याबद्दल स्टँम्पपेपर वर लिहून द्यावे लागेल असे सांगून पतसंस्थेकडून पैसे मिळणे अशक्य आहे अशी भीती निर्माण करून त्यांना फक्त ३० टक्के रक्कम देऊन ठेवपावत्या खरेदी करून ठेवीदारांचे आर्थिक नुकसान केले आहे.
वरील नमूद आरोपींनी सदर पतसंस्थेकडे कर्जाच्या नावाने घेतलेल्या ठेवीदारांचा पैसा पूर्ण परतफेड न करता पतसंस्थेचे अवसायक पहिले आरोपी नामे जितेंद्र गुलाबराव कंडारे, अटक आरोपी सुजित सुभाष वाणी व इतर यांच्याशी संगनमत करून पूर्ण रक्कम परतफेड केल्याच्या खोट्या नोंदी करून ठेवीदारांचा केवळ ३० टक्के रक्कम बेकायदेशीर रित्या अदा करून महाराष्ट्र मल्टीस्टेट को. ऑप अँक्ट २००२ चे नियम २९चे जाणीवपूर्वक व हेतुपुरस्पर उल्लंघन केले आहे. व इतर ठेवीदारांना सुद्धा त्यांच्या कष्टाची व हक्काची रक्कम समप्रमाणात मिळणे आवश्यक्य असतांना या गैरकृत्यामुळे त्यांना वंचित ठेवले.