जळगाव (प्रतिनिधी) बीएचआरचे फॉरेनसिक ऑडीट करीत असताना काही व्यक्तींना चौकशीत बोलावले होते, असे भासविण्यासाठी सीए महावीर जैन याने जितेंद्र कंडारे, सुजीत वाणी, प्रकाश वाणी, सुनिल झंवर व इतरांशी संगणमत केले. तसेच त्यांनी केलेल्या फॉरेन्सीक ऑडीट रेकॉर्डला पत्र दिल्याचे भासविण्यासाठी पत्रे तयार करुन रेकॉर्डला ठेवली. सदरची पत्रे ज्यांच्या नावे लिहिली आहेत, त्यांना प्रत्यक्षात पाठविली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. एवढेच नव्हे तर त्या पत्रांवर अर्धवट पत्ते लिहीलेले होते, अशी देखील धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.
पोलीस तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, महावीर जैन हा सुरुवातीपासूनच संगनमताच्या कटात सहभागी होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान महावीर जैनच्या कार्यालयाच्या झडतीमध्ये बीएचआर संस्थेचे मुळ कागदपत्रे तसेच चौकशीमधील काही मुळ कागदपत्रे मिळून आली आहेत.
महावीर जैनवर गंभीर ठपका
तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, धरम सांखला व सुनंदा सांखला यांनी आपल्या कर्जाची रक्कम परतफेड केलेली नसतानाही ती परतफेड केली आहे असे गैरहेतुने व पूर्वनियोजीत कटानुसार महावीर जैन व विकास चोरडीया यानी त्याचे अहवालात खोट नमुद केले आहे. महावीर जैन याने पतसंस्थचे सी.ए. म्हणून काम पहात असताना लेखापरिक्षणाकामी मॅचिंग केलेल्या ठेवीदारांचे बँक खाते व कर्जदारांचे बँक खाते तपासुन ठेवीचा पुर्ण पैसा मिळालेले आहे का?, याची जाणिवपुर्वक खात्री केली नाही. तसेच कर्जदारांचे खाते उतारे इतर आरोपींचे मदतीने मिळवून त्यावर १२ टक्के सरळ व्याजदराचा हिशोब लावला. गुन्हयातील इतर आरोपींसोबत संगनमत करून कट रचून मुदत ठेवीच्या पावत्या एंजंटामार्फत २० ते ३५ टक्क्यापर्यंत विकत घेवून कर्जदाराच्या खात्यात मुदत ठेवीची संपुर्ण रक्कम वर्ग केल्या. तसेच ठेवीदाराला सर्व रक्कम दिल्याचे खोटया नोंदी दर्शवून कर्जदारांची कर्ज जितेंद्र कंडारे व सुजित वाणी यांच्या मदतीने निल केली आहेत.
सहकार आयुक्त व निंबधक सहकारी संस्थेला कंडारेने लिहिलेलं पत्र जैनच्या कार्यालयात सापडले
अवसायक जितेंद्र कंडारे याने सहकार आयुक्त व निंबधक सहकारी संस्था म. रा. पुणे यांना दिलेले पत्रामध्ये मालमत्ता लिलावाद्वारे विक्री करताना ठेवीदारांच्या ठेवी वर्ग केल्याचे नमुद केले नाही. ते पत्र महावीर जैन याच्या कार्यालयातील झडतीमध्ये मिळाले आहेत. ही बाब सी.ए महावीर जैन याने आपल्या ऑडिट रिपोर्टमध्ये नमुद न करता अवसायक जितेंद्र कंडारे याला जाणीवपूर्वक मदत करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवली. आरोपी याने जाणीवपूर्वक दिशाभूल करणारा व संबंधीत गुन्हेगारांना अभय देणारा ऑडीट रिपोर्ट ज्यामध्ये जाणीवपूर्वक खोटे शेरे देवून सत्यपरिस्थीती लपवून स्वतःच्या व इतर संशयित आरोपींच्या फायदयासाठी उपयोग केला.
कंडारे, झंवरच्या घरात सापडले महत्वपूर्ण दस्तऐवज
तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, दि. २७ नोव्हेंबर २०२० रोजी संशयित आरोपी जितेंद्र कंडारेच्या घरझडतीमध्ये रोख रक्कम रू. ९ लाख ७८ हजार रुपये, तसेच २५,००,०००/- चे सोन्या चांदीचे दागिने व काही मालमत्ताचे कागदपत्र मिळुन आले आहेत. अन्य संशयित आरोपी सुनिल झंवरच्या घरझडतीमध्ये मालमत्तांचे २६१ दस्त व इतर कागदपत्रे, विविध शासकीय आस्थापनांचे ६० शिक्के, स्वतः व कुटुंबियांशी संबंधीत नसलेले ८२ बँक खातेधारकांचे डेबीट कार्ड, १०१ खातेधाराकंचे चेकबुक मिळुन आले आहेत.