जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात पोलीस कोठडीत असलेल्या ११ संशयित आरोपींपैकी जयश्री अंतिम तोतलाने कर्जाबाबत काहीच माहिती नसून पती अंतिम तोतला यांनी सर्व व्यवहार केल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पुणे आर्थिक गुन्हे शाखा आता अंतिम तोतलाकडे पुढील चौकशी करणार आहे. दरम्यान, अंतिम तोतलाच्या चौकशीतून महत्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जयश्री अंतिम तोतलाचा गुन्ह्यातील सहभाग मोठ्या स्वरुपात आहे. जयश्री तोतलाने बीएचआर संस्थेत नवीपेठ येथे कर्ज खाते क्रमांक – ०००३२०७०००५६ मधील एकूण बाकी रक्कम १,६५,४९,३४८ यापैकी १,३९,४९,३४८ रुपये ही रक्कम वेगळ्या ठेवदारांच्या ठेवी कमी किमतीत घेऊन पुर्ण पैसे परतफेड करण्यासाठी वापर केला आहे. असे करतांना तिने स्वतःनेमलेल्या एजंट मार्फत ठेवीदारांमध्ये सदर पतसंस्था बुडाली असुन जी रक्कम मिळत आहे, ती गुपचुप पदरात पाडून घ्या. नाही तर ती पण मिळणार नाही. कुणालाच ठेवी चे पैसे मिळणार नाही. ठेवीदारांच्या ठवी बुडल्यात जमा आहे, पतसंस्थेकडून पैसे मिळणे अश्यक्य आहे, अशी भीती निर्माण करून त्यांना फक्त ३० टक्के रक्कम देऊन ठेवपावत्या खरेदी करून ठेवीदारांचे आर्थिक नुकसान केले आहे. परंतू पोलीस तपासात जयश्री तोतलाने पोलिसांना आपल्या पतीचे नाव सांगितले. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड नोटमध्ये अंतिम तोतलाची चौकशी करायची असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, जळगाव शहरात जन्मलेल्या अंतिम तोतलाने १९९३ मध्ये १२ कोटीच्या उलाढालसह तोतलाने प्रोग्रेसिव्ह पेट्रोलियम नामक कंपनी सुरु केली होती. ही कंपनी केरोसीन, डीझेल,सल्फर, कोळशासह इतर इंधन प्रकारातही व्यवसाय करत होती. दरम्यान, त्याकाळात पेट्रोल, डीझेलमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळसाठी ‘नॅफ्था’चा वापर व्हायचा आणि भारतात ‘नॅफ्था’चा आयात करणाऱ्यापैकी तोतला एक मोठा डीलर होता. कालांतराने महाराष्ट्र आणि गोव्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये तोतलाविरूद्ध भेसळीचे नऊ गुन्हे दाखल झाले होते. तर कधीकाळी अंतिम तोतला तेलगी आणि इंधन घोटाळ्याच्या केंद्रस्थानी होता. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत महत्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे.