मुंबई (वृत्तसंस्था) एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रावादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. छगन भुजबळ यांची १०० कोटी रुपयांचा बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली आहे, असा दावा भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
छगन भुजबळ यांची १०० कोटी रुपयांची संपत्ती आयकर विभागाने जप्त केली आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. आज सकाळी ७ वाजता ट्विट करत त्यांनी आयकर विभागाकडून भुजबळांची १०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात डायरेक्टर आयकर विभाग (इन्वेस्टिगेशन) मार्फ़त सेशन कोर्ट मुंबईत दावा दाखल करत कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती देखील मिळत आहे. किरीट सोमय्या, आणि माहिती अधिकार कार्यकरत्या अंजली दमानिया यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती.
मंगळवारी इन्कम टॅक्स विभागाने प्रेसनोट जारी केलीय. समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि छगन भुजबळ यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. जी संपत्ती, बेनामी मालमत्ता त्यांनी कलकत्त्याच्या कंपनीद्वारे खरेदी केली होती, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. सेशन कोर्टमध्ये बेनामी ट्रान्झॅक्शनच्या अंतर्गत फौजदारी प्रक्रिया दावा दाखल करण्यात आला आहे. त्याची सुनावणी होणार आहे. छगन भुजबळांना ७ वर्षापर्यंतची सजा होऊ शकते, असा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे.