नाशिक (वृत्तसंस्था) राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तिन्ही पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली आहे. तरदुसरीकडे नाशिकमध्ये शिवसेना भाजपला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजपचे दोन बडे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली असताना नाशिकमध्ये राजकीय वारे वाहायला सुरुवात झाली आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजपचे दोन बडे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या दोन्ही नेत्यांनी कालच (७ जानेवारी) शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. राऊतांशी तब्बल दोन तास चर्चा केल्यानंतर त्यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं होतं. आज (8 जानेवारी) संध्याकाळी ६ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेनाप्रवेश होईल. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्रीवर हा प्रवेशसोहळा होईल. नाशिक महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. पालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व पक्ष जमेल त्या पद्धतीने राजकीय दावपेच टाकत आहेत. शिवसेनेनेही रणनीती आखायला सुरुवात केली आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही पोकळी भरुन काढण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु होते. त्यानंतर आता नाशिक भाजपचे दोन बडे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत आणखी काही नगरसेवकसुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
सुनील बागुल आणि वसंत गीते दोनही नेते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची आज पुन्हा घरवापसी होणार आहे. परंतु, या दोन्ही नेत्यांची घरवापसी जरी असली तरी भाजपला हा मोठा धक्का समजला जात आहे. विशेष म्हणजे, माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेला धक्का मानला जात होता. परंतु, सानप यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे भाजपमध्येच फूट पडल्याचे पाहण्यास मिळाले होते. भाजपमधील अनेक नेत्यांनी सानप यांना भाजपमध्ये पुन्हा प्रवेश देऊ नये अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. पण, सर्वांचा विरोध डावलून सानप यांना पक्षात घेण्यात आले होते. सानप यांच्या घरवापसीमुळे नाशिक, धुळे जिल्ह्यातील शेकडो भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहे. सानप यांच्या भाजप प्रवेशाचा बदला घेण्यासाठी आता शिवसेनेनं रणनीती आखली आहे. आता या दोन्ही नेत्यांसोबत अनेक कार्यकर्तेही सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.