मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील तब्बल 12 आमदारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर फोन केला. पण ठाकरेंनी त्यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला, असा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी म्हणजे २७ जुलैला शिंदे गटातील काही आमदार उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. या आमदारांना उद्धव ठाकरे यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. त्यासाठी संबंधित आमदारांकडून मातोश्रीवर फोनही करण्यात आला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या संबंधित आमदारांना भेट नाकारल्याचे समजते.
उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेचे कारण पुढे करत या आमदारांना भेटणे टाळले, असे ठाकरे गटाच्या गोटातून सांगितले जात आहे. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार, मंत्री उदय सामंत यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. आमच्यापैकी कोणीही उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला नाही. याउलट उद्धव ठाकरे यांच्या गटातील १० आमदारांनी एकनाथ शिंदे यांना फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यापैकी सहा आमदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील. मी आत्ता लगेच त्यांची नावं सांगू शकतो. परंतु, राजकारणात नैतिकता पाळायची असते, असे उदय सामंत यांनी सांगितले.
















