मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या घराबाहेर आज सकाळी पैसे आणि सोन्यानं भरलेली बॅग आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्रसाद लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना सकाळी पाचच्या सुमारास सुरक्षा रक्षकांचा फोन आला. सुरक्षा रक्षकांनी घराबाहेर बॅग पाहायला मिळाली असल्याचं सांगितले. माहिती मिळताच प्रसाद लाड घराबाहेर आले आणि त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसही तात्काळ प्रसाद लाड यांच्या घराबाहेर आले. त्यांनी या बॅगेची झडती घेतली असता त्यात सोनं, चांदी आणि पैसे सापडले आहेत. झालेल्या प्रकाराने प्रसाद लाडही चकीत झाले आहेत. मात्र असे पैसे, सोनं आणि चांदीने भरलेली बॅग घराबाहेर आढळल्याने प्रसाद लाड यांनी संशय व्यक्त केला आहे. पोलिसाही आता घराबाहेर असणाऱ्या सीसीटिव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. ही बॅग कुणी ठेवली, कधी ठेवली? याचा शोध माटुंगा पोलीस घेत आहेत. दरम्यान, यापूर्वीही प्रसाद लाड यांच्या घराबाहेर असं संशयित बॅग किंवा वस्तू सापडली होती. जेणेकरून त्यांच्या सुरक्षेला धोका असल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून प्रसाद लाड यांनी मुंबई पोलिसांना विनंती केलेली आहे की, या परिसरातील सुरक्षा वाढवावी, पोलिसांची गस्त वाढवावी, यामुळे भविष्यात कुठलीही अप्रिय घटना किंवा त्यांच्या सुरक्षेला धोका होऊ नये.