मुंबई(वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडींवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यांनतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व प्रशासकीय कार्यक्रम रद्द करून तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.
फडणवीस यांची आज मंत्रालयात १ वाजता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठक झाल्यानंतर ते आमदारांच्या भेटीगाठी घेणार होते. ते सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आजच्या न्यायालयीन सुनावणीमध्ये दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद झाला. कोर्टाने पुढील सुनावणी ८ ऑगस्टला होणार असल्याचे निश्चित केले.
शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्ह प्रकरणाचा निवडणूक आयोगाने कुठलाही निर्णय देऊ नये, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्याने राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार महिन्याभरापासून रखडलेला आहे. विस्तार उद्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे ८ आमदार आणि एकनाथ शिंदेंचे ७ आमदार शपथ घेणार आहेत. असे एकूण १५ आमदार शपथ घेणार आहेत, असे वृत्तांनी सांगितले.
अशातच ज्यांना मंत्रिपदे दिली जाणार, त्यांच्या नावांची यादी निश्चित झाली आहे. त्यामुळे फडणवीस दिल्लीकडे पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी तातडीने रवाना झाल्याचे बोलले जात आहे.