धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चमगाव फाट्याजवळ आज सकाळी खताने भरलेला एक ट्रक धरणगाव कृषी विभागाने पकडल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी ट्रक मालक नसल्यामुळे ट्रकातील भरलेला माल वैध आहे की, अवैध हे स्पष होऊ शकलेले नाहीय.
या संदर्भात सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील चमगाव फाट्याजवळ आज सकाळी एका ट्रक (एमएच १८, बीजी ५८०३) मधून एका पिकअप व्हॅनमध्ये खताची गोणी भरली जात असल्याची गोपनीय माहिती धरणगाव कृषी विभागाचे श्री. चव्हाण यांना मिळाली. त्यांनी त्यानुसार तात्काळ घटनास्थळ गाठले. श्री. चव्हाण यांनी चमगावचे पोलीस पाटील अविनाश सोनवणे यांना घटना स्थळी बोलावून घेतले. तसेच याबाबतची माहिती धरणगाव पोलीसानाही देण्यात आलीय. त्यानंतर त्यांनी पिकअप वरील चालकाला खतांची गोणी कोणत्या शेतकऱ्याकडे घेऊन जात असल्याचे विचारले असता, त्याला काहीही सांगता आले नाही. त्यामुळे आता ट्रक मालकाची वाट बघितली जात असून त्यांच्याकडे संबंधित खताशी निगडीत काही पावत्या असल्याची त्याची खात्री केली जाईल. ट्रक मालक समोर येत नाही, तोपर्यंत काहीही सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया श्री. चव्हाण यांनी दिली. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली आहे.