मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकारचा स्थापन होऊन दोन आठवडे झाले आहेत. तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे 19 जुलैला हा विस्तार होईल असे सांगण्यात येत होते. परंतु आता मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबल्यामुळे बंडखोर आमदार चिंतेत पडले आहेत.
नाराजी टाळण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार लांबतोय
राष्ट्रपती निवडणुकीत नाराजी टाळण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्याचवेळी 19 ते 21 जुलैदरम्यान मोजक्याच 10 मंत्र्यांचा शपथविधी होणार अशी माहिती समोर आली होती. मात्र, बंडखोर आमदारांची सध्याच्या सरकारला नाराजी भोवण्याची शक्यता आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याची चर्चा आहे.
शिंदे गटाकडून अधिकच्या मंत्रिपदाची मागणी
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या नाराजीची भीती आणि शिंदे गटाकडून अधिकच्या मंत्रिपदाची मागणी होत आहे. तसेच भाजपमध्ये मंत्रिपदासाठी मतैक्य देखील होत नाहीय. यामुळेच राज्यातील शिंदे सरकारचा शपथविधी लांबणीवर पडला आहे. भाजपला 29 आणि शिंदे गटाला 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री अशी 13 मंत्रिपदे देण्याचे ठरले होते. शिंदे गटात ठाकरे सरकारमधील 7 मंत्री आहेत. त्यांना मंत्रिपद द्यावे लागणार आहे. शिंदे गटात 40 बंडखोरांसह 10 अपक्ष आहेत. म्हणूनच शिंदे गटाला अधिकची मंत्रिपदे पाहिजे आहेत. दुसरीकडे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत नाराजी नाट्य होऊन याचा फटका भाजप उमेदवाराला बसू शकतो. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतरच 19 ते 21 जुलैच्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, अशी चर्चा आहे.