नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला गुरुवारी बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेत तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यावर सुप्रीम कोर्टाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली असून संध्याकाळी पाच वाजता शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला उद्या म्हणजेच गुरुवारी बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. त्यानंतर शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुनील प्रभू यांच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडताना ही बहुमत चाचणी बेकायदेशीर असून १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय अद्याप झालेला नाही असं सांगितलं. आजच यावर सुनावणी व्हावी अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. परंतू जोपर्यंत तुम्ही आम्हाला कागदपत्रं देत नाही तोवर आम्हाला बहुमत चाचणी कधी आहे कसं कळणार अशी विचारणा केली. यावर अभिषेक मनू सिंघवी यांनी आपण आज संध्याकाळपर्यंत कागदपत्रं सादर करु असं सांगितलं.
अगदी हवं तर ६ वाजता सुनावणी ठेवा अशी विनंतीही त्यांनी केली. यावर राज्यपालांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी बहुमत चाचणीसाठी बोलावणे हा राज्यपालांचा अधिकार असून त्यात मध्यस्थी केली जाऊ शकत नाही. कोणत्याही परिस्थितीत, अपात्रतेचा अर्ज प्रलंबित राहण्याचा याच्याशी काहीही संबंध नाही असं सुप्रीम कोर्टानेच म्हटलं असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी हे प्रकरण तातडीने ऐकावं लागेल असं स्पष्ट केलं आहे. तसंच आजच ५ वाजता सुनावणी होईल असं स्पष्ट केलं आहे. एवढेच नव्हे तर कोर्टाने अभिषेक मनू सिंघवी यांनी ३ वाजेपर्यंत कागदपत्रं तयार ठेवण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा नववा दिवस आहे. मंगळवारी, भाजपच्या गोटातून मोठ्या घडामोडी घडल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली भाजप श्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर रात्री मुंबईत राज्यपालांची त्यांनी भेट घेतली. सरकारने बहुमत गमावले असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर आज राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी पत्र देत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत.
















