मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेनचं विधीमंडळ कार्यालयच आता सील करण्यात आलं आहे. एकनाथ शिदे गट विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना, असा संघर्ष निर्माण झालेला असताना शिवसेनाला हा मोठा झटका बसला आहे. यामुळे पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे. शिवसेना विधिमंडळ पक्ष यांच्या सूचनेवरून कार्यालय बंद केल्याची नोटीस दरवाज्यावर लावण्यात आली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी रविवारपासून बोलावलेल्या विशेष अधिवेशनाची सुरुवातच अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेच्या वादानेच होताना दिसत आहे. विधानभवनातील शिवसेनेचे कार्यालय सील करण्यात आल्याने आता ‘व्हीप’वरून शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष होताना दिसत आहे.
आजपर्यंतची बिनविरोध अध्यक्ष निवडीची परंपरा मोडीत काढून यंदा भाजप-शिंदे गटाकडून अॅड. राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीतर्फे राजन साळवी या रिंगणात आहेत. शिवसेनेने सर्व आमदारांना व्हीप बजावला असून शिंदे गटाने सेनेच्या आदित्य ठाकरेंसह १६ जणांना व्हीप बजावला आहे. सकाळी ११ वाजता अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.
शिवसेनेने काल सर्व आमदारांना विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी व्हीप जारी केला आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक थोड्याच वेळात पार पडणार आहे. आता एकनाथ शिंदे गटानेही सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. हा व्हीप शिवसेनेच्या लेटरपॅडवर बजावला आहे, यात राहुल नार्वेकर यांना विजयी करा असा आदेश देण्यात आला आहे. काल शिवसेनेने व्हीप बजावला होता, या व्हीपमध्ये राजन साळवी यांना विजयी करण्याचे आदेश दिले आहेत.