जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्यावर राष्ट्रवादीने थेट बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे. याबाबतचे आदेश पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी आज काढले आहेत.
शिवाजीराव गर्जे यांनी संजय पवार यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, धरणगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये आपण पक्षाच्या कोणत्याही पदावर नसताना शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनलच्या वतीने निवडणूक लढवित आहात असे बॅनर्स / पोस्टर्स लावलेले होते. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी – संजय पवार गट अशा प्रकारचा उल्लेख करून पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्यांचे फोटो लावून पदाधिकारी / कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये अशा प्रकारचा कोणताही गट नाही. सदरील बॅनर्स/ पोस्टर्स तातडीने काढून टाकण्यात यावेत अशी सूचना दि. २१ एप्रिल २०२३ रोजीच्या पत्रान्वये आपणास करण्यात आली होती. आपण वरील सूचनेनुसार कोणतीही कार्यवाही केलेली नाही तसेच याबाबतचा लेखी खुलासा देखील कार्यालयास पाठविण्याची तसदी घेतलेली नाही.
पक्षविरोधी कृत्य करू नये अशा वारंवार सूचना देऊनही आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध कारवाया करून पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरविण्याचे कृत्य करत असल्याचे निदर्शनास आले आहे. सबब आपणास आज दि. १६ मे २०२३ पासून पक्षातून बडतर्फ करण्यात येत आहे. तरी यापुढे आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्यांचे फोटो वापरू नयेत. तसे केल्यास आपल्यावर पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही शिवाजीराव गर्जे यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, संजय पवार यांनी याबाबत बोलतांना सांगितले की, बडतर्फ करण्याची कारवाई ही जिल्ह्यातील नेत्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारावर करण्यात आली आहे. ही कारवाई करण्याआधी प्रदेशाध्यक्ष किंवा सरचिटणीस यांनी माझे म्हणणे सादर करण्याची मला संधी दिली पाहिजे होती. मी पक्षाविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही. कुठंही पक्षाचे चिन्ह वापरलेले नाहीय. राहिला नेत्यांचा फोटोचा विषय तर शरद पवार साहेब आणि अजितदादा पवार हे माझे दैवत आहे. मरेपर्यंत त्यांचा फोटो लावण्यापासून मला कुणीही रोखू शकणार नाहीत. लवकरच प्रदेशध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि अजितदादांची भेट घेऊन आपली बाजू मांडणार असल्याचे पवार यांनी सांगितले.