पाटणा (वृत्तसंस्था) संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात १५ जिल्ह्यातील ७८ मतदारसंघांमध्ये आज (७ नोव्हेंबर) सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी ३.०० वाजेपर्यंत बिहारमध्ये जवळपास ४४ टक्के मतदानाची नोंद करण्यात आलीय.
बिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालीय. या टप्प्यात १५ जिल्ह्यांतील ७८ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. ७८ मतदारसंघांतून तब्बल १२०४ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. सकाळी ७.०० वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात झालीय. हा मतदानाचा शेवटचा टप्पा असून येत्या १० नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. बिहारमधील मतदार आज एकूण १ हजार २०८ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानासह आज वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक आहे. या ठिकाणी ७ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधील मतदारांना मतदानाचा नवा रेकॉर्ड बनवण्याचे आवाहन केले आहे.