मुंबई (वृत्तसंस्था) भाजपाकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. तर, पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना मात्र संधी मिळालेली नाही, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवाल्या आहेत.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी दिली जाईल असं म्हटलं जात होतं. मात्र, भाजपने जाहीर केलेल्या यादीत पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश नाहीये आणि पंकजा मुंडेंसाठी हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. त्यासोबतच चित्रा वाघ यांनाही विधानपरिषदेवर संधी दिली जाणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र, आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत उमा खापरे यांच्या नावाचा समावेश करुन सर्वांनाच भाजपने एक झटका दिला आहे. भाजपने ज्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत त्यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांच्या नावांचा समावेश आहे. एकूण १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधान परीषदेच्या आमदारांचा कार्यकाळ संपला आहे.
या आमदारांचा संपला कार्यकाळ
रामराजे निंबाळकर
सुभाष देसाई
प्रविण दरेकर
प्रसाद लाड
सदाभाऊ खोत
संजय दौंड
विनायक मेटे
दिवाकर रावते
शिवसेनेचे दोन उमेदवार जाहीर
शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांच्या नावांची घोषणा केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर सचिन अहिर यांनी आपला वरळी विधानसभा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडला. त्यानंतर आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी सुद्धा झाले. आदित्य ठाकरे यांच्यासाठी मतदारसंघ सोडणाऱ्या सचिन अहिर यांचं पूर्नवसन करण्यासाठी आता शिवसेनेने त्यांना विधानपरिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.