बीड (वृत्तसंस्था) खासदार प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न झाल्याचे पडसाद आता दिसून येत आहेत. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी जरी आपण नाराज नसल्याचे जाहीर केले असले, तरी देखील बीड जिल्ह्यातील १४ भाजप समर्थकांनी राजीनामा दिल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच ११ तालुकाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. आतापर्यंत एकूण २५ पदाधिकाऱ्यांनी राजीमाना दिला आहे.
मोदी सरकार म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांना स्थान मिळाले. मात्र, खासदार प्रितम मुंडे यांना कोणतेही मंत्रिपद दिले गेले नाही. याच कारणामुळे बीडमधील भाजप पदाधिकारी नाराज आहेत. याच नाराजीतून बीड जिल्ह्यातील सर्वच भाजप तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिलाय. यामध्ये परळीसह एकूण ११ तालुकाध्यक्षांचा समावेश आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर अन्याय झाल्याने हे पदाधिकारी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. नाराज पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. या ११ तालुकाध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर भाजपला रामराम ठोकणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या आता २५ वर पोहोचली आहे. बीडमधील या राजीनामासत्रामुळे भाजपला चांगलाच धक्का बसला आहे.
११ तालुकाध्यक्षांनी राजीनामा देण्यापूर्वी येथे एकूण १४ भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. यामध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे आणि युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांचासुद्धा समावेश आहे. या राजीनाम्यांमुळे राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.