धुळे (वृत्तसंस्था) नवनीत राणा प्रकरण हे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा घणाघाती आरोप धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बघितलं तर महाराष्ट्रात दंगे घडावे, राज्यात अशांतता निर्माण व्हावी आणि याचे सारे खापर महाविकास आघाडी सरकारवर फुटावे असा प्रयत्न भाजपतर्फे सुरू आहे, असा गोटेंनी केला. ‘मातोश्री’च्या बाहेर हनुमान चालीसा पठण करण्यावरून नवनीत राणा यांनी घातलेल्या वादावर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अनिल गोटेंनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरबाहेर झालेल्या हिंसक आंदोलनानंतर कुठल्याही ज्येष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणं हे चुकीचं असल्याचं फडणवीस म्हणाले होते. परंतु नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा केल्यानंतर फडणवीसांनी त्यांना का थांबवले नाही? असा सवाल गोटेंनी केली. देवेंद्र फडणवीस हे फार कपटी माणूस आहे, असं म्हणत गोटेंनी खोचक टीका केली.
नवनीत राणा प्रकरणासंदर्भात गोटे यांनी भाजपची भूमिका ही ‘मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली’ अशीच काहीशी आहे. प्रकरणामध्ये भाजपनं उघडउघड पाठिंबा न देता हे सर्व प्रकरण घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केला.