मुंबई (वृत्तसंस्था) आज विधान भवनात शिवसेना आणि भाजपमध्ये खेळीमेळीचे वातावरण पाहण्यास मिळाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनातून बाहेर येत असताना प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, प्रसाद लाड यांनी गाडी थांबवून त्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्य्क मिलिंद नार्वेकर यांनी ‘यांना आताच गाडीत टाका, शिवबंधन बांधूया’ असे म्हंटले. त्यावर दरेकर यांनी ‘आम्ही आम्ही केव्हाही एकत्र येऊ शकतो, हे आमचं मूळ आहे,’ असं उत्तर दिलं.
विधिमंडळाचे आगामी पावसाळी अधिवेशनाच्या कामकाज बाबत कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. २ दिवसांचे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला विधानसभा सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार याबरोबरच विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रावीण दरेकर, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल परब, सुधीर मुनगंटीवार उपस्थितीत होते.
बैठक आटोपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनातून कारने बाहेर निघत होते. त्यावेळी मागण्याचं निवेदन देण्यासाठी भाजप नेते प्रविण दरेकर, गिरीश महाजन आणि प्रसाद लाड यांनी यांनी मुख्यमंत्र्यांची कार थांबवून भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनीही लगेचच गाडीतून उतरून त्यांचं निवेदन स्वीकारलं. यावेळी उपस्थित नेत्यांमध्ये हास्यविनोद रंगला. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी यावेळी भाजपच्या नेत्यांना शिवबंधन बांधण्याची भाषा केल्यानं वेगळीच चर्चा रंगली. हे सगळं सुरू असतानाच मिलिंद नार्वेकर हे धावत पुढं आले. निवेदन घेण्यासाठी मुख्यमंत्री थांबल्याचं लक्षात येताच नार्वेकरही गप्पांमध्ये सहभागी झाले. साहेब, या लोकांनी तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न केलाय का, असं नार्वेकर गमतीनं म्हणाले. त्यावर आम्ही केव्हाही येऊ शकतो असं प्रवीण दरेकर म्हणाले. दरेकरांच्या या उत्तरावर यांना आत्ताच कारमध्ये घ्या. शिवबंधन बांधूया असं नार्वेकर म्हणाले. दरेकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता, ‘आम्ही केव्हाही एकत्र येऊ शकतो, हे आमचं मूळ आहे,’ असं उत्तर दिलं. त्यावर पुन्हा एकदा हंशा पिकला.
गाडीत एकालाच प्रवेश मिळेल
गप्पागोष्टी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जायला निघाले. तेव्हा तिघांनीही आम्हाला तुमच्या गाडीत घ्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. त्यावर एकालाच गाडीत प्रवेस मिळेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर या तिघांनीही दिलखुलास हसून त्याला दाद दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा विधानभवनातून बाहेर पडला.