पुणे (वृत्तसंस्था) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला इशारा दिला आहे. भाजपने राज ठाकरे यांच्या नादाला लागून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करू नये, असा सल्ला आठवलेंनी भाजपला दिला आहे.
“जनधन, उज्वला आणि मुद्रा योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणात नागरिकांना फायदा झाला आहे. आवार योजनेत अनेकांना पक्की घरे मिळाली आहेत. आयुष्यमान भारत योजनेत सव्वा दोन लाखाच्या वर लोकांना लाभ झाला आहे. जात-धर्म न पाहता नरेंद्र मोदी यांनी या योजना सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जातीनिहाय जनगणना व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. त्यातून जातीभेद वाढणार नाही, तर ज्या जाती अधिक मागास आहेत, त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे सोयीचे होणार आहे. दलितांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. त्यांना आत्मनिर्भर करण्याची आवश्यकता आहे,” असेही त्यांनी सांगितले.