मुंबई (वृत्तसंस्था) भाजपसाठी ट्विटरचे राजकीय महत्व आता संपले आहे. जे ट्विटर कालपर्यंत भाजप किंवा मोदी सरकारसाठी राजकीय लढ्याचा अथवा प्रचाराचा आत्मा होता, ज्याच्या अतिरेकाचा वापर करूनच भाजप आणि मोदींनी २०१४ साली निवडणुका जिंकल्या. तेच ट्विटर आता भाजपसाठी ओझे झाले आहे. हे ओझे कायमचे फेकून देण्याच्या निर्णयाप्रत मोदी सरकार आले आहे, अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे.
मुद्यावर शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. ‘कालपर्यंत हे ट्विटर म्हणजे भाजप किंवा मोदी सरकारसाठी त्यांच्या राजकीय लढ्याचा किंवा प्रचाराचा आत्मा होता. आता भाजपला ट्विटरचे ओझे झाले असून हे ओझे कायमचे फेकून द्यावे या निर्णयाप्रत मोदींचे सरकार आले आहे. समाजमाध्यमांवर गेल्या काही वर्षांपासून चिखलफेकीचा, बदनामी मोहिमांचा कार्यक्रम सुरू आहे. त्याची निर्मिती, दिग्दर्शन, नेपथ्य, कथा-पटकथा सर्वकाही भाजपचेच होते. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्अँप या माध्यमांचा मनसोक्त वापर करण्याची रीत इतर राजकीय पक्षांना माहीत नव्हती तेव्हा या कार्यात (२०१४) भाजपने नैपुण्य प्राप्त केले होते. त्या काळातील प्रचारात भाजपच्या फौजा जमिनीवर कमी, पण सायबर क्षेत्रांतच जास्त खणखणाट करीत होत्या. हिंदुस्थानातील ट्विटरसह सर्वच समाजमाध्यमांचे जणू आपणच मालक आहोत व सायबर फौजांच्या माध्यमांतून आपण कोणतेही युद्ध, निवडणूक जिंकू शकतो, विरोधकांना उद्ध्वस्त करू शकतो, असा एकंदरीत तोरा होता. पाकिस्तान, कश्मीरच्या बाबतीत सर्जिकल स्ट्राईकचे युद्ध फिके पडेल असे मोठे युद्ध भाजपच्या सायबर फौजाच खेळत होत्या. जणू अर्धे पाकिस्तान आता मोदी सरकारच्या ताब्यात आलेच आहे. आगामी काळात कराची, इस्लामाबादवर विजयी ध्वज फडकविण्याची तयारी सुरू असल्याचा माहोल भाजपच्या सायबर फौजांनी जगभरात निर्माण केला.’ अशी खिल्ली सेनेनं भाजपच्या आयटी सेलची उडवली.
‘उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांच्या निवडणुका जिंकल्या व ते करताना राजकीय विरोधकांची यथेच्छ बदनामी करण्यात येत होती. त्या काळात राहुल गांधी यांना ज्या शब्दांत ट्विटर किंवा फेसबुकवर शिवराळ शब्द वापरले गेले ते कोणत्या नियमात बसले? मनमोहन सिंगांसारख्या ज्येष्ठ नेत्यास काय काय विशेषणे लावली? उद्धव ठाकरे यांच्यापासून ममता बॅनर्जी, शरद पवार, प्रियांका गांधी, मुलायम सिंग यादव अशा राजकारण व समाजकारणात हयात घालविलेल्या नेत्यांच्या विरोधात या ‘ट्विटर’ वगैरेंचा वापर करून बदनामी मोहिमा राबविल्या गेल्या. जोपर्यंत हे हल्ले एकतर्फी पद्धतीने सुरू होते तोपर्यंत भाजपवाल्यांना गुदगुल्या होत होत्या, पण आता त्यांच्या सायबर फौजांसमोर विरोधकांचे त्याच ताकदीचे सैन्य उभे करून हल्ले सुरू झाले तेव्हा भाजपच्या तंबूत घबराट झाली’ अशी टीका सेनेनं केली.
प. बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा, डेरेक ओब्रायन या जोडीने ‘ट्विटर’च्या दुधारी तलवारीने भाजपलाच घायाळ केले. बिहार निवडणुकीत तेजस्वी यादवने ‘ट्विटर’च्या माध्यमातून मोदी व नितीश कुमारांना उघडे केले. राहुल गांधी व प्रियांका गांधी या ट्विटरच्या माध्यमातून मोदी व त्यांच्या सरकारला ‘जोर का झटका धीरे से’ देत असतात व त्याचे पडसाद देशभरात उमटताना दिसतात. जसे उपराष्ट्रपती नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ‘ब्लू टिक’ हटवताच सरकारने ट्विटरशी भांडण सुरू केले’ अशी बोचरी टीकाही सेनेनं केली.