कोलकाता (वृत्तसंस्था) बंगालमध्ये बाहेरच्या लोकांना आणि सिनेकलावंतांना तिकीट दिल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते नाराज असून त्यांनी बंगालमधील अनेक शहरात रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली आहेत. तसेच भाजपने बंगालच्या अलीपूरद्वार विधानसभा मतदारसंघात अर्थतज्ज्ञ अशोक लाहिरी यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. लाहिरी यांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं आहे.
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मात देण्यासाठी केंद्रीय मंत्री, खासदारांची फौज पश्चिम बंगालमध्ये उतरवणाऱ्या भाजपला मात्र स्वकीयांशीच लढावे लागत असल्याचं चित्रं आहे. तिकीट वाटपावरून भाजपमध्येच मोठा राडा सुरू झाला आहे. यावेळी लाहिरी यांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं आहे. एवढेच नव्हे तर आम्ही लाहिरींना उमेदवारच मानत नाही, असं भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांना सुनावलं. अखेर पक्षाने लाहिरी यांचं तिकीट कापून जिल्हा महासचिव सुमन कांजीलाल यांना तिकीट दिलं. जगतादल आणि जलपाईगुडीमध्येही असाच काही प्रकार झाला. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर या दोन्ही मतदारसंघात टीएमसीतून आलेल्यांना तिकीट दिल्याचं कार्यकर्त्यांना समजलं. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी थेट तोडफोडच सुरू केली.
मालदाच्या हरिशचंद्रपूरमध्येही कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात तोडफोड केली. या ठिकाणी भाजपने मातिउर रहमान यांच्या नावाची घोषणा केली. मातिउर यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड सुरू केली. मालदाच्या ओल्डा मालदा सीटमध्ये गोपाल साहा यांच्या नावाची घोषणा केली. त्याला भाजप कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध करत जोरदार निदर्शने केली. या ठिकाणीही भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात तोडफोड केली. गोपाल साहा यांना उमेदवारी दिल्याने पक्षाचंच नुकसान होणार आहे, असं येथील भाजप कार्यकर्त्यांचंच म्हणणं आहे.