मुंबई (वृत्तसंस्था) टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक हटवण्यात आली आहे. सेलिब्रिटीच्या ट्विटर अकाऊंटवरची ब्लू टिक म्हणजे त्याचं अधिकृत ट्विटर अकाऊंट असतं, पण तरीही धोनीच्या अकाऊंटवरची ब्लू टिक काढून टाकण्यात आली आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनी सोशल मीडियावर फारसा अॅक्टिव्ह नसला तरी त्याच्या फॉलोअर्सची संख्या ही ८२ लाखांच्या घरात आहे. धोनीनं मागच्या वर्षी १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर तो कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. नुकताच त्यानं कुटुंबीयांसोबत शिमला व दुबई दौरा केला होता. त्यानंतर तो त्याच्या नव्या हेअर स्टाईलमुळे चर्चेत आला होता. पण, आज ट्विटरनं उचललेल्या एका पाऊलमुळे सोशल मीडियावर धोनीचीच चर्चा सुरू झाली आहे.
महेंद्रसिंग धोनी हा अनेक युवकांसाठी प्रेरणादायी आहे. भारतीय क्रिकेटमधील त्याचे योगदान हे उल्लेखनीय आहे. त्यामुळेच त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०११चा वन डे वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो जगातील पहिला व एकमेव कर्णधार आहे. महेंद्रसिंग धोनीनं ९० कसोटींत ४८७६ धावा केल्या आणि त्यात ६ शतकं व ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. ३५० वन डेत १०७७३ धावा आणि त्यात १० शतकं व ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. ९८ ट्वेंटी-२०त त्याच्या नावावर १६१७ धावा आहेत.
पण, शुक्रवारी ट्विटरनं महेंद्रसिंग धोनी या ट्विटर हँडलची ब्लू टीक काढली.. ट्विटरवर ८ जानेवारी २०२१ला धोनीनं अखेरचं ट्विट केलं होतं आणि मागील अनेक महिने या हँडलचा वापर न झाल्यानं ट्विटरनं ब्लू टीक मार्क काढली. दरम्यान, एमएस धोनीने बराच काळ ट्विटरचा वापर केलेला नाही, त्यामुळे ही ब्लू टिक काढल्याचं सांगितलं जात आहे.