बोदवड (महेंद्र पाटील) बोदवड नगरपंचायतीने प्रशासनाची दिशाभूल करून दलित वस्तीचा निधी दुसऱ्याच प्रभागात वळवल्याची तक्रार प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका एकता निंबोळकर उर्फ एकताबी लतीफ शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
नगरसेविका एकता निंबोळकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी दलित वस्तीतून निवडून आलेली आहे. माझ्या प्रभागातील दलित वस्ती निधी इतरत्र वळवू नये, अशी विनंती केली होती. मात्र राजकीय दबावाखाली चुकीचा व दिशाभूल करणारा प्रस्ताव पाठवून दलित वस्तीचा निधी प्रभाग ६ मध्ये निधी वळवला गेला. यासाठी नगरपंचायतीने नगररचना विभाग यांना दि. ३० जानेवारी २०२३ रोजी दिलेले पत्र पूर्णपणे दिशाभुल करणारे व चुकीचे आहे.
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश नप/नादवसुयो/आरआर/२८९/२०२३ दिनांक ३१/०३/२०२३ हा रद्द करावा तसे न केल्यास दलित लोकांचा हक्क डावलला जाईल व तो एक गुन्हा ठरेल. तर सदर प्रस्तावाची आपण पुन्हा शहानिशा करावी व चुकीचा प्रस्ताव पाठवणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करत गुन्हे दाखल करावेत. तसेच दलित वस्तीसाठीच्या निधीचा इतरत्र वापर करून दलित लोकांचा हक्क डावलण्यात येत आहे. यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी सदर काम ताबडतोब रद्द करावे अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल व संबंधीतांवर गुन्हे दाखल करावे लागतील, असा इशारा देखील बोदवड नगरपंचायत विभागाला देण्यात आला आहे.















