फैजपूर (प्रतिनिधी) येथील सतपंथ संस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांडप्रकरणी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वना केली. तसेच अकरा हजार रुपयाची मदत केली.
महामंडलेश्वर जनार्दन महाराज म्हणाले की, झालेली घटना अत्यंत निर्दयी व दुःखद आहे. मनुष्यजीवनाला काळीमा फासणारी ही घटना असून हे अघोरी कृत्य करणारांचा तीव्र निषेध आहे. महाराजांनी प्रत्यक्ष घटना घडली त्या ठिकाणी भेट देऊन नंतर त्यांनी आदिवासी वसतिगृहात जाऊन संबंधित पीडित कुटुंबाची भेट देखील घेतली. या कुटुंबाच्या पाठीशी संपूर्ण परिसर, संत समाज, सर्व संप्रदाय असल्याचे आश्वासन देऊन परिवाराला प्राथमिक तात्काळ मदत म्हणून अकरा हजार रुपये रोख दिले. शासनाने केलेल्या मदती व्यतिरिक्त काही आवश्यक गरजा असतील त्या परिसरातून सोडवण्याचा प्रयत्न करू असेही कुटुंबास सांगितले. परंतू अशी घटना होऊ नये म्हणून शासनाने या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.