मुंबई (वृत्तसंस्था) एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या भाजप आमदार नितेश राणे यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. राज्य सरकारवर टीका करताना नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारापणावरून टीका केली. मुख्यमंत्र्यांना उगाच मानेला पट्टा लागला नाही, सोनिया गांधींसमोर वाकून वाकून त्यांच्या मानेला पट्टा लागला असल्याची टीका नितेश राणे यांनी केली.
यावेळी नितेश राणे यांनी एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी एक दिवसाचे विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे. एसटीच्या विलीनीकरणाच्या विधेयकाला आम्ही एकमुखी पाठिंबा देऊ असेही नितेश राणे यांनी म्हटले. भाजप आंदोलन पेटवत असल्याचा आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला होता. त्यावर बोलताना राणे यांनी मागील आठ वर्षांपासून शिवसेनेकडेच हे खाते होते याची आठवण करून दिली. हे कर्मचाऱ्यांचेच आंदोलन असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले. कोरोना काळात मुख्यमंत्री घरात बसून होते, त्यावेळी माझा कामगार एसटी घेऊन रस्त्यावर होता असेही नितेश राणे यांनी म्हटले.
उपस्थितांसमोर बोलताना राणे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मानेवर कसलीशी सर्जरी झाली आहे. डॉक्टरांनी निष्कर्ष काढलाय या माणसाला कणा तरी आहे का? मुख्यमंत्र्यांना उगाच मानेला पट्टा लागला नाही, सोनिया गांधीसमोर वाकून वाकून लागला आहे. फक्त ठाकरे लावले म्हणजे बाळासाहेब होता येत नाही. बाळासाहेब कुठे तू कुठे, ठाकरे म्हणजे ठाकरेंचं रक्त येत नाही. रक्ताची चाचणी करण्याची वेळ आणू नको असे वादग्रस्त वक्तव्यही नितेश राणे यांनी केले.