पुणे (वृत्तसंस्था) विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याची चर्चा केवळ तुमच्या मनात आहेत, आमच्या कुणाच्याही मनात नाही. या चर्चांना अजिबात महत्व नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजितदादा राष्ट्रवादी सोडणार, या मुद्द्याची हवा काढण्याचा प्रयत्न केला. परंतू दुसरीकडे अजित पवार यांनी आज सकाळपासून त्यांच्या सोशल मीडिया हँडल वरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले वॉलपेपर डिलीट केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
तुम्हाला फाटे फोडण्याचा अधिकार नाही !
पुण्यात पत्रकारांसोबत बोलतांना शरद पवार म्हणाले की, सध्या ही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्याा कुणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. काहीतरी बातम्या तयार करण्याचं काम कुणीतरी करतंय. त्याला काहीही अर्थ नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरतं सांगू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षात काम करणारे आमचे सगळे सहकारी एका विचाराने पक्षाला शक्तीशाली कसं करायचं या भूमिकेत आहेत. त्याशिवाय दुसरा कुठलाही विचार कुणाच्या मनात नाही. त्यामुळे मी एकदा स्पष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला फाटे फोडण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी पत्रकारांना सुनावले.
राष्ट्रवादीचा उल्लेख असलेले वॉलपेपर हटविले !
दुसरीकडे अजित पवार यांनी त्यांच्या सोशल मिडियावरील फेसबूक आणि ट्विटरवर वॉलपेपर काढून टाकला आहे. अजित पवार यांनी यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाव आणि चिन्ह त्यासोबत शरद पवार यांच्यासोबतचा फोटो लावला होता. तो पोस्ट सहित डिलिट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जात आहे.
अजित पवार यांनी सोशल मिडियावरील पक्षाचे नाव, चिन्ह आणि स्वतःचा फोटो असलेला वॉलपेपर काढून टाकले आहे. #AjitPawar #NCP pic.twitter.com/h4osStG07u
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) April 18, 2023
अजित पवारांनी 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचंही वृत्त !
दरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचं वृत्त ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राने दिली होती. सह्या मिळवण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करत आहेत, असंही वृत्तात म्हटलं आहे. शिवाय यंदा शरद पवार हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत, असंही द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे. 2019 साली अजित पवार यांचं बंड शरद पवार यांच्यामुळेच फसलं होतं. कारण अजित पवारांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना थोरल्या पवारांनी स्वतः फोन केले होते. मात्र यंदा तसं काहीही होताना दिसत नाही.