जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा दूध संघाची दोन दिवसापूर्वी स्थगित झालेली निवडणूक प्रक्रिया वेळेवरच होणार होणार आहेत. राज्य सरकारने याबाबत नवीन अध्यादेश काढला आहे. दरम्यान, ‘द क्लिअर न्यूज’ ने याबाबत सकाळीच प्रकाशित केलेल्या वृत्तावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे.
राज्यात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तसेच सहकारी संस्थांच्याही निवडणुका आहेत. दोन्हीचे कार्यक्षेत्र ग्रामीण भाग असल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेता जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकांची प्रक्रिया शासनाने स्थगित केली होती. तसेच नवीन प्रक्रिया २० डिसेंबर नंतर सुरु होणार होती. परंतू आमदार मंगेश चव्हाण हे निवडणूक वेळेवर व्हावी, यासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत निवडणूक वेळेवर घेण्याची विनंती केली होती. आज याबाबतचे आदेश नुकतेच समोर आले आहेत. या आदेशात २९ नोव्हेंबर रोजी ज्या टप्प्यावर निवडणूक थांबवण्यात आली होती, तेथूनच पुढे सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राचे कार्यकारी अधिकारी अनिल जे. चौधरी यांच्या सहीचे हा आदेश आहे.
मी आणि गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आम्ही सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवडणूक वेळेवर घ्यावी, अशी विनंती केली. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे कोणतीही अडचण येत नाही, हे लक्षात आणून दिले. त्यानुसार निवडणूक वेळेवर होणार आहे.
– आमदार मंगेश चव्हाण
शासनच्या नव्या आदेशानुसार १० डिसेंबर रोजीच मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या तारखेत कोणताही बदल नाही.
– संतोष बिडवई (जिल्हा उपनिबंधक )