मुंबई (वृत्तसंस्था) सन 2017 सालच्या प्रभाग रचनेप्रमाणेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मविआ सरकारच्या काळात वाढवलेली वॉर्डरचना रद्द करण्यात आली आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.
राज्याताली जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या वॉर्ड रचनेमध्येही बदल करण्यात आला होता. अनेक ठिकाणी नवीन वॉर्डची रचना करण्यात आली होती. आता ते वाढवलेले नवीन वॉर्डही रद्द करण्यात येत आहेत. 2017 ला जेवढी वॉर्ड संख्या होती, तेवढीच वॉर्ड संख्या यंदाही कायम राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. भाजपकडून आधीच मागणी करण्यात आली होती की जुन्या वार्ड रचनेप्रमाणे निवडणुका घेण्यात याव्या.
आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याच्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. कुठलीही जनगणना 2017 नंतर झालेली नाही. 2021 ला जनगणना अपेक्षित होती. मात्र कोरोना आल्यामुळेही जनगणनाही झाली नाही आणि त्याचमुळे आहेत तसंच वार्डचं गणित राहावं अशी भाजपची अपेक्षा होती. तसेच वाढवलेले वॉर्ड हे चुकीच्या पद्धतीने वाढवल्याचेही त्यांनी म्हटले होते.
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना मुंबईतील वॉर्डरचना नऊने वाढवून ती 227 वरुन 236 वर नेली होती. त्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत त्याला विरोध केला होता. वाढवलेले नऊ वॉर्ड हे शिवसेनेच्या फायद्यासाठी असल्याचा आरोपही भाजपने त्यावेळी केला होता. आता शिंदे सरकारने हे वाढवलेले नऊ वॉर्ड रद्द केले आहेत.