मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मुक्ताईनगर ते बोदवड रस्त्याच्या दरम्यान एका नाल्यात तरुणाचा निर्घुण खून करून मृतदेह फेकून देण्यात आल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे मृतदेहाच्या चेहऱ्यावर दगड आणि टनक हत्याराने वार केलेले होते. त्यामुळे चेहरा छिन्नविच्छिन्न असलेल्या अवस्थेत होता. थोड्यावेळाने रविद्र मधुकर पाटील (वय-48, रा. चिनावल ता. रावेर), असे खून झालेल्या तरुणाची ओळख पटली आहे.
या संदर्भात अधिक असे की, श्री संत मुक्ताई मंदिराच्या मागील बाजूस बोदवड रोडला लागूनच मंगळवारी सकाळी एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक पोलिसांच्या एका पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता मयत तरुणाच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने तसेच दगडाने वार केल्याची दिसून आले. त्यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर रक्ताचा सडा पडलेला होता.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी हलवला. काही वेळातच मयत तरुण रावेर तालुक्यातील असल्याचे उघड झाले. मयत रविंद्र पाटील यांच्या हातावर त्याची मुलगी रोशनी हिचे नाव गोंदलेले होते. याच गोंदलेल्या नावावरून ओळख पटवण्यात पोलिसांना मदत झाली. तसेच दुसरीकडे नम्रता पाटील यांनी आपले पती रविंद्र पाटील हे गेल्यादोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार सावदा पोलिस स्टेशनला दिलेली होती.
दरम्यान, रवींद्रचा खून कोणी आणि का केला?, याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी लवकरच खुनाचा उलगडा होईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांनी भेट दिली होती.