मुंबई (वृत्तसंस्था) दिव्यांगांना पोलीस आणि संरक्षण क्षेत्रातील नोकरीत दिल्या जाणाऱ्या ४ टक्के आरक्षणाचा कोटा केंद्र सरकारनं रद्द केला आहे. हा निर्णय देशातील कोट्यवधी दिव्यांगांवर अन्याय करणारा असून केंद्राच्या या निर्णयाचा शिवसेना अपंग सहाय्य सेनेने तीव्र निषेध केला आहे.
केंद्रातील मोदी सरकारने कोट्यवधी दिव्यांग बांधवांचा सहानुभूतीने विचार करावा आणि त्यांना पुनश्च दिव्यांगासाठी केंद्राने बनविलेल्या २०१६ कायदयाच्या अनुषगाने चार ऐवजी पाच टक्के आरक्षणाचा हक्क देऊन त्यांची सहानुभूती परत मिळवावी, अशी मागणी शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे यांनी केली आहे.
दिव्यांग घटक त्यांचे चार टक्के आरक्षण अचानक रद्द केल्यामुळे संतप्त झाला आहे. किमानपक्षी या उपेक्षित घटकाला तरी केंद्राने आपल्या निष्ठुर निर्णयाच्या वरवंट्यापासून मुक्त करावे आणि रद्द करण्यात आलेले आरक्षण पुनश्च बहाल करुन दिलासा द्यावा, असे आवाहन सूर्यकांत लाडे आणि सुभाष कदम यांच्या सह तमाम दिव्यांग बांधवांनी केंद्र सरकार किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.
















