जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील रावेर, सावदा व यावल भागात कृषी आकस्मिक निधीचा वापर करून देखभाल व दुरुस्तीची कामे वेगाने करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले. रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्या पुढाकाराने वीज समस्यावर मंत्रालयात आयोजित बैठकीत डॉ. राऊत यांनी हे आदेश दिले.
नादुरुस्त रोहित्रे वेळेत दुरुस्त करून देण्याबाबत, फिडरची लांबी कमी करणे, रोहित्रांना ऑईलपुरवठा करणे, सातपुड्याच्या पर्वतीय भागात वसलेल्या आदिवासी गावांना योग्य दाबाचा वीजपुरवठा करण्यासाठी ३३ केव्ही उपकेंद्राची उभारणी, धरणाजवळील भागात सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी व इतर विषयावर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ.राऊत यांनी यावेळी महावितरणला दिले.
जळगाव जिल्ह्यात नवीन कृषिपंप धोरणांतर्गत शेतकऱ्यांनी ७३.४२ कोटी रुपयांचा भरणा केला असून यातील २४.२३ कोटी रुपयांचा उपयोग ग्रामपंचायत स्तरावर व २४.२३ कोटी रुपये इतकी रक्कम कृषिपंप वीज जोडणीसाठी वापर करण्यात येणार आहे. या भागातील शेतकरी वीजबिल भरून सहकार्य करत असल्याने कृषी आकस्मिक निधीचा वापर करून त्यांच्या वीज समस्या सोडवण्याकडे लक्ष देण्याचे निर्देशही डॉ.राऊत यांनी दिले. रावेर, सावदा व यावल या भागातील नादुरुस्त रोहित्रे दुरुस्त करून रोहित्र तेलाचा साठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना डॉ.राऊत यांनी यावेळी दिल्या. वडगाव येथे १३२ केव्ही उपकेंद्र उभारण्याबाबत सर्वेक्षण करण्याच्या सूचना त्यांनी महापारेषणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीस महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे, महावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे हे प्रत्यक्ष तर जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारुख शेख, पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर मानकर हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.