जळगाव (प्रतिनिधी) मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेच्या ताबा मिळवण्यासाठी जानेवारी २०१८ मध्ये भोईटे गटाकडून अॅड. विजय पाटील यांना पुण्यात बोलवून धमकावल्या प्रकरणी विजय पाटील यांनी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात शुक्रवारपासून केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)चे पथकाने चौथ्या दिवशी (सोमवार) सुनील झंवर, पारस ललवाणी, नितीन लढ्ढा यांच्यासह काही जणांचे जबाब नोंदवले. यामध्ये सीबीआयकडे पुराव्यासाठी काही महत्वाचे कागदपत्र सुध्दा सादर करण्यात आले आहे.
सुनील झंवर यांनी दिले पुरावे
फिर्यादी विजय भास्कर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे ज्या फ्लॅटमध्ये त्यांना डांबून ठेवण्यात आले होते तो फ्लॅट सुनील देवकीनंदन झंवर यांच्या मालकीचा असल्याने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी झंवर पिता- पुत्राला अजिंठा विश्रामगृहावर चौकशीसाठी बोलावले होते. तेथे, चौकशी दरम्यान झंवर यांनी सांगितले, की या फ्लॅटवर माझी मुलगी शिक्षणासाठी राहात होती. नंतर तो रिकामाच होता. असे कधी घडलेच नाही,असे झंवर यांनी जबाबात सांगितल्याचे कळते. तसेच सुनील झंवर यांनी काही ऑडीओ क्लीप आणि पुराव्यासाठी काही महत्वाची कागदपत्रे सीबीआयकडे सादर केली आहे. तर सीबीआयने झंवर यांच्याकडून काही महत्वाचे कागदपत्र सुध्दा ताब्यात घेतल्याचे कळते. दरम्यान, यावेळी सुरज झंवरही आपल्या वडिलांसोबत अजिंठा विश्रामगृहात आले होते.
२९ लोकांचे मोबाईल नंबर व त्यांचे लोकेशन मिळण्याच्या मागणीवर कामकाज नाही !
या प्रकरणात मार्च महिन्यातच उच्च न्यायालयात रिटपिटीशन टाकून गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व २९ लोकांचे मोबाईल नंबर व त्यांचे लोकेशन मिळण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार खंडपीठाने आदेश करूनही त्यावर काम झाले नाही. आर्थिक गुन्हे शाखेच्या सुचेता खोकले यांनी बीएचआर प्रकरणात सूरज झंवर यांना अटक केल्यावर या फ्लॅटवर केलेल्या पंचनाम्यात लॅपटॉप व काही दस्तऐवज जप्त केल्याचे नमूद केले. त्याबाबत विचारणा केली असता, असेकाही जप्तच केले नाही, असे त्यांनी लेखी स्वरूपात दिल्याचे कागदपत्रे, खंडपीठाचे आदेशाच्या घटनाक्रमासह प्रती झंवर यांनी सीबीआयकडे सुपूर्द केल्याचेही कळते.
नितीन लठ्ठा यांचाही जबाब !
सुनील झंवर यांच्या जबाबात माजी महापौर नितीन ला यांचा उल्लेख आल्याने तत्काळ सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी लढा यांना पचाराण करून स्वतंत्र चौकशी करून दोन्ही जबाबाचा ताळमेळ बसतो का, याची खात्री केली. या गुन्ह्यात पारस ललवाणीसह इतरांचे जबाब घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. तत्पूर्वी सीबीआयने तत्कालीन संचालक गोकूळ पिंताबर पाटील, परमानंद साठे, वीरेंद्र भोईटे, महेंद्र भोईटे, शिवाजी भोईटे, अलका पवार, सुषमा इंगळे, जयवंतराव येवले, जयवंतराव देशमुख आदींसह १३ जणांचे लेखी जबाब नोंदवून घेतलेले आहेत.
खंडणी प्रकरणाची माहिती जाणून घेतली !
सुनील झंवर यांचे जबाब नोंदवीत असतांना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी बीएचआर गुन्ह्यात खंडणी मागितल्याचे प्रकरणाचीही माहिती जाणू घेत त्यासंबंधी पुरावे, दस्तऐवज ताब्यात घेतल्याचे कळते.