धरणगाव (प्रतिनिधी) झुरखेडा ग्रामपंचायतच्या १४ वा वित्त आयोगाच्या बँक खात्यातून तत्कालीन सरपंचाच्या खोट्या सह्या करून दोन वेगवेगळ्या रकमेचा धनादेश वटवला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे याबाबत सरपंचानी जिल्हा परिषदकडे तक्रार करून देखील कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
तालुक्यातील झुरखेडा ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारा संदर्भात लक्ष्मीबाई जामसिंग मोरे यांनी एका पत्रकाद्वारे व फोन वरून माहिती दिली आहे की, ग्रामपंचायत झुरखेडा येथे दि. ३ मार्च २०१८ रोजी प्रशासकीय आदेश मिळाले. त्यात दलित वस्तीत कॉग्रेटिकरंण व गावात पेव्हर ब्लॉक बसविणे याची कामे आली होती. पण मी ह्या कामासाठी कुठेही सह्या केलेल्या नाहीत. तरी देखील ही कामे पूर्ण कशी करण्यात आली, असे मला कळताच मी मासिक मिटिंग व धनादेश वर सह्या करण्याचे बंद केले. त्यानंतर साधारण दिड ते दोन वर्षांपासून ग्रामपंचायतमध्ये कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांवर सह्या व अंगठा करीत नसून देखील धनादेश बँकेतून पास होतात कसे?, याची चौकशी करण्यासाठी मी पिंप्री येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे आमच्या झुरखेडा ग्रामपंचायतचे १४ वा वित्त आयोगाचे खाते आहे ते चेक करण्यासाठी बँक मॅनेजर यांच्याशी चर्चा करून बँक स्टेटमेंट काढले. त्यात असे आढळुन आले की, दोन वेगवेगळ्या रक्कमेचे दोन व्यक्तीच्या नावे धनादेश पास करण्यात आले आहेत. याबाबत माहिती मीळताच मी लगेच गटविकास अधिकारी पंचायत समिती धरणगाव,जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा परिषद जळगाव यांना पत्राद्वारे काळविलेले होते. दोन महिन्यात १४ व्या वित्त आयोगातुन रू १७६००० व ७०००० ग्रामसेवकांनी परस्पर काढल्याचे लक्षात येताच ,सरपंच श्रीमती लक्ष्मीबाई यांनी मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.याबाबत सर्व पत्र व्यवहाराच्या प्रती राज्य महिलाआयोगाकडेही सादर केली आहेत.
परंतु आतापर्यंत या गोष्टीकडे कुणीही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. दुसरीकडे गावातील सरपंच या नात्याने कोरोनासारख्या एवढ्या महामारी आजाराच्या काळात मी प्रत्येक ठिकाणी हजर होते. एवढे चांगले काम करून देखील मला दि. २२ सप्टेंबर रोजी ग्रामसेवक निळे यांच्याकडून व गावातील व्हाट्सएपग्रुप वरून कळाले की, मला सरपंच पदावरून अपात्र करण्याची प्रक्रीया मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव व विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक विभाग नाशिक यांच्या कार्यालयाकडून झालेली आहे. पण मी एक दलित समाजाची महिला सरपंच असून मला माझी बाजू न मांडू देता कोणतेही लेखी पत्र अथवा फोन न करता असा एकतर्फी निर्णय कसा घेतला गेला ? असे लक्ष्मीबाई यांचे म्हणणे आहे. तसेच लक्ष्मीबाई मोरे यांनी आतापर्यंत विभागीय आयुक्त नाशिक, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, मा गुलाबराव पाटील पालकमंत्री जळगाव, जिल्हाधिकारी जळगाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. जळगाव, मा गटविकास अधिकारी पंचायत समिती धरणगाव, श्रीमती चंद्रिका चव्हाण महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्य यांच्याकडे तक्रार केलेल्या आहेत. परंतु आजपर्यंत या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारे तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. झुरखेडा ग्रामपंचायतला शासनाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळत असून तो जर अश्या प्रकारे खर्च होत असेल तर मी तो का म्हणून सहन करावा?. गावाच्या विकास कामासाठी आवाज उठवने गुन्हा असेल तर मी तो करत राहील. माझी चुकी नसतांना मला सरपंच पदावरून अपात्र करणे ही बाब माझ्यासाठी निंदनीय आहे, असेही लक्ष्मीबाई मोरे यांचं म्हणने आहे. तरी वरील सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी असा त्यांनी आग्रह धरला आहे.