मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोटबँक तयार केली असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर स्पष्टीकरण देतानाही नव्या वादाला तोंड फुटणारं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्वधर्म समभावाची नाही, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होटबँक तयार केली असं मी म्हणाले. याचा अर्थ असा नाही की ईव्हीएम मशीन घेऊन तयार केली. तर त्यांनी जनमत तयार केलं. त्यात चुकीचं काय?,” अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली. या वक्तव्याविरोधात कोणीतरी निदर्शन करणार होतं, मला धमकीही आली होती. पण आम्ही कोणाला छेडणार नाही, पण कोणी छेडलं तर त्याला सोडणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी दिला. पुढे ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्वधर्म समभावाची नाही. त्यांनी शंकराची पूजा केली आणि हिंदू धर्माची पूजा केली. कारण हिंदू धर्म हा सर्वधर्म समभाव शिकवतो”.