मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आधीपासूनच माणसांच्या गर्दीत रमणारं व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. कोणीही सामान्य माणूस त्यांना थेट भेटायला जाऊ शकत होता. त्यासाठी पूर्वी नगरविकास मंत्री असतानाही त्यांचं कौतुक होत होतं. मात्र आता त्यांच्या याच वैशिष्ट्यावर मर्यादा आलेली दिसत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यावर आता मर्यादा येणार आहेत. पूर्वी आपल्या समस्या, प्रश्न घेऊन आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मुख्यमंत्री शिंदे भेटत होते. मात्र आता ते शक्य होणार नाही. आता सर्वसामान्यांच्या भेटीला वेळेचं बंधन असणार आहे. तसंच निवेदने स्विकारण्यावरही हे बंधन असणार आहे. प्रत्यक्षरित्या निवेदन सादर करण्यासाठी आलेल्यांना त्यांची निवेदने कार्यालयीन कामाच्या दिवशी दुपारी २ ते ४ या वेळेत स्विकारली जाणार आहेत. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेली पत्र मुख्यमंत्री सचिवालय, टपाल कक्ष, मुख्य इमारत तळ मजला येथे जमा करून त्याची पोच दिली जाणार आहे. याच्या पाठपुरावा संदर्भात माहिती मिळवण्यासाठी टपाल कक्षाइथल्या मुख्यमंत्री सचिवालयाला भेट देता येणार आहे.