मुंबई (वृत्तसंस्था) दीड वर्षानंतर अखेर महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या परवानगीने घटस्थापनेच्या मुहूर्तावर गुरुवारपासून भाविकांसाठी मुंबईसह राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक मुंबईचे कुलदैवत असणाऱ्या मुंबादेवीचे दर्शन घेतले. सर्व जनतेला, भक्तांना, विनंती आहे की आनंदी राहा सुरक्षित रहा, असं यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यादेखील उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. आजपासून मंदिर आणि प्रार्थना स्थळे खुली झालेली आहेत. सर्व जनतेला, भक्तांना, विनंती आहे की आनंदी राहा सुरक्षित रहा” कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली असून धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वानी पार पाडली पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.
तब्बल दीड वर्षानंतर अखेर महाराष्ट्रातील जनतेला मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेता येणार आहे. राज्य सरकारने कोरोनाचे सर्व नियम पाळून आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरं खुले करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज पहाटेच राज्यातील सर्व प्रसिद्ध मंदिरांची दारं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीचे साई बाबा मंदिर, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, शेगावचे गजानन महाराज मंदिर, पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर, कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, तुजळापुरातील भवानी मातेचं मंदिर आजपासून सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं आहे.