मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडेआठ वाजता फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवादामध्ये काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वीकेंड लॉकडाऊन केल्यानं प्रथमच राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या संवादामध्ये ते वीकेंड लॉकडाऊनला राज्यातील जनतेने दिलेला प्रतिसाद, राज्यातील कोरोना लसीकरण, रक्तदान, सरकारी आणि खासगी कार्यलयांमध्ये वर्क फ्रॉम होम सुरु करणे याबाबत संवाद साधण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच्या संवादामध्ये महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याबाबत घोषणा करु शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत तसेच रविवारी टास्कफोर्स सोबत बैठक घेतली होती. त्याबैठकीत राज्यातील कोरोना स्थितीवर चर्चा देखील झाली. त्यापूर्वी ८ मार्चला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील संवाद साधला होता. राज्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आणण्याबाबत लॉकडाऊन हा पर्याय असल्याचं मत तज्ञांनी मांडलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार हे पाहावे लागणार आहे.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घोषणा करतील अशी माहिती दिली होती. “महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच निर्णय घेतील, असं मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री अस्लम शेख यांनी आज माध्यमांना सांगितलं होतं.