जळगाव (प्रतिनिधी) नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या प्रचारकार्यात जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची मुलं सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे भाजपचाही तांबे यांना पाठींबा असल्याची जोरदार चर्चा आजच्या कार्यक्रमामुळे सुरु झाली आहे.
नाशिक विभागीय मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अद्याप कुणालाही पाठिंबा दिला नसला तरी जळगावात मात्र कॉंग्रेसचे माजी प्रदेश सचिव डी.जी. पाटील यांचे चिरंजीव तथा नुकतेच भाजपात प्रवेश केलेले धरणगावचे युवा नेते चंदन पाटील हे आज सत्यजित तांबे यांच्या प्रचारकार्यात दिसून आलेत. शिरपूरमध्ये देखील भाजपचे दिग्गज नेते व माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या संस्थेत मात्र सत्यजीत तांबे यांचा प्रचार मेळावा दणक्यात पार पडला होता. यामुळे भाजपचाही तांबे यांना पाठींबा असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे. जळगावात आज तांबे यांचा प्रचार मेळावा दणक्यात पार पडला आहे. यावेळी डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील ह्या देखील उपस्थित होत्या. जिल्हा कॉंग्रेसमधील दोन बड्या नेत्यांची मुलं तांबे यांच्या प्रचारात सहभागी झाल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, यावेळी सत्यजित तांबे यांनी आपल्या उमेदवारीची पार्श्वभूमी सांगून आगामी उद्दिष्टांबाबत माहिती दिली. उपस्थितांनी आमचे सत्यजित तांबे यांच्या कुटुंबाशी असलेले ऋणानुबंध आणि डॉ.सुधीर तांबे यांनी प्रत्येक घटकास केलेले सहकार्य यामुळे सत्यजित तांबे यांना पाठिंबा देत असल्याचे सांगितले. तांबे यांच्यासोबत असलेला मोठा युवावर्ग याही निवडणुकीत प्रथमपासूनच त्यांच्यासोबत आहे. ‘जिकडे तांबे तिकडे आम्ही’ अशी या युवकांची धारणा आहे. मात्र जुने जाणते काँग्रेस आणि थोरातनिष्ठ कार्यकर्ते थोडी सावधानतेची भूमिका घेताना दिसत होते. आता मात्र एक एक करत ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी सत्यजित तांबे यांच्यासोबत प्रचार कार्यात दिसत आहेत.
















