सातारा (वृत्तसंस्था) सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच दगडफेक केली. या घटनेमुळे साताऱ्यात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नऊ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, आज (मंगळवार) सकाळी नऊ वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल बाहेर पडू लागला. यामध्ये काही धक्कादायक निकाल लागल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद साताऱ्यात उमटले. विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचा त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षातील ज्ञानदेव रांजणी यांनी पराभव केला. असे एक एक धक्कादायक निकाल बाहेर पडताच त्याचे पडसाद उमटू लागले.
काही कार्यकर्त्यांनी तडक राष्ट्रवादी कार्यालयावर जाऊन दगडफेक केली. ही घटना सकाळी दहा वाजता घडली. याची माहिती मिळाल्यानंतर सातारा पोलिसांची पळापळ झाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सुमारे नऊ संशयितांना ताब्यात घेतले आहे. हे सर्व कार्यकर्ते कोण आहेत? त्यांचा नेमका हेतू काय? याची पोलिस चौकशी करत आहेत. या घेटनेनंतर पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी घटनास्थळी भेट दिली.