मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) विधान परिषदेच्या सहा जागा लढवणार आहे. प्रत्येक पक्षाला दोन जागा मिळणार आहेत. आज काँग्रेसकडूनही दोन नावे जाहीर करण्यात आली आहेत. काँग्रेसने दोन्ही जागांवर मुंबईकरांना संधी दिली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
राज्यात विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच प्रमुख पक्षांकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी यादी जाही करण्यात येत आहे. भाजपाने उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर, काँग्रेसकडूनही आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशनुसार या दोघांच्या नावांना मान्यता दिली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस मुकूल वासनिक यांनी या माहितेचे परिपत्रक काढले आहे. काँग्रेसकडून मोहन जोशी, सचिन सावंत, अतुल लोंढे, सिद्धार्थ हत्ती अंबरे, हर्षवर्धन संकपाळ यांच्या नावांची चर्चा होती. अखेर दिल्लीतून जगताप आणि हंडोरे यांच्या नावं निश्चित करण्यात आलं आहे.