कोल्हापूर (वृत्तसंस्था) 10 तारखेला आचारसंहिता संपली असतानाही कॉंग्रेस आणि भाजपाने वृत्तपत्रात बातमी तसेच जाहीरात दिल्याचा आरोप करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी केला आहे. आचारसंहितेचं उल्लंघन झाल्यानं ही निवडणूक रद्द करण्यात यावी, जर ती रद्द झाली नाही तर आपण सुप्रीम कोर्टापर्यंत (Supreme Court) जाऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे.
करुणा शर्मा म्हणाल्या, “कोल्हापूर उत्तरमध्ये आचारसंहितेचं उल्लंघन झालं असून १० तारखेलाच इथं आचारसंहिता संपली होती. तरीही काँग्रेस आणि भाजपनं आपापल्या मोठ्या वर्तमानपत्रात जाहिरात आणि प्रचाराच्या बातम्या दिल्या आहेत. यामुळं आचारसंहितेचं उल्लंघन झालं आहे. त्याचबरोबर या पक्षांचे लोक इथं पैसे वाटताना पकडले गेले आहेत. याशिवाय इथं काँग्रेस आणि भाजपकडून ४० लाखांहून अधिक खर्चही झाला आहे. यासंदर्भात मी निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल केली आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही कारवाई करण्यात आलेली नाही. खरतरं मतमोजणी रद्द करुन ही निवडणूकच रद्द करण्यात यायला हवी होती. पण तरीही मतमोजणी सुरु आहे याचा मी विरोध करतो. याविरोधात आता मी कोर्टात धाव घेणार आहे. ही लोकशाही आहे, कायदा सर्वांसाठी समान आहे”
मी हारुनही जिंकणारी बाजीगर
आचारसंहिता भंगाचे माझ्याकडे पुरावे असून त्यावरुनच मी तक्रार दाखल केली आहे. काल रात्री मी कलेक्टर ऑफिसला याची तक्रार दाखल केली आहे. यानंतर मुंबईला गेल्यानंतर हायकोर्टात मी रिट पिटिशन दाखल करणार आहे. या निवडणुकीत माझा आधीच विजय झाला आहे. मला राजकारणात प्रस्थापित होण्यासाठी या निवडणुकीची मदत झाली हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मला मतं जरी कमी असली तरी मला या निवडणुकीत बरचं काही शिकायला मिळालं आहे. यासाठी मी देवाचे आभार मानते. मी हारुनही जिंकणारी बाजीगर आहे, असंही पुढे करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे