नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना म्यूटेशन ट्रॅक करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
‘पुन्हा एकदा तुम्हाला पत्र लिहिण्याची वेळ माझ्यावर आलीय कारण आपला देश कोविड त्सुनामीच्या विळख्यात अडकला आहे. अशा प्रकारच्या अनपेक्षित संकटात भारतीय जनतेलाच आपलं सर्वात जास्त प्राधान्य असायला हवं. देशातील जनतेला या त्रासातून वाचवण्यासाठी जे काही शक्य होईल ते करण्याची मी तुम्हाला विनंती करत आहे’, असंही राहुल गांधी यांनी या पत्रात म्हटलंय.
‘जगातील प्रत्येक सहा लोकांमध्ये एक व्यक्ती भारतीय आहे. आकार, भारतातील अनुवांशिक विविधता आणि गुंतागुंतीमुळे भारतात विषाणूला आपलं स्वरूप बदलण्यासाठी आणि अधिक धोकादायक होण्यासाठी अनुकूल वातावरण मिळतंय, हे या महामारीतून धडधडीतपणे समोर आलंय. सध्याची परिस्थिती पाहता कोरोना विषाणूचं ‘दुहेरी उत्परिवर्तन’ आणि ‘तिहेरी उत्परिवर्तन’ ही सुरुवात असू शकते, अशी मला भीती वाटतेय. या विषाणूचं अनियंत्रितरित्या प्रसार होणं हे केवळ देशासाठीच नाही तर जगासाठी अतिशय घातक ठरू शकतं’ अशी भीतीही राहुल गांधींनी व्यक्त केलीय.
सोबतच, ‘हा विषाणू आणि त्याच्या विविध प्रकारांची वैज्ञानिक पद्धतीनं अभ्यास व्हायला हवा. विषाणूच्या उत्परिवर्तनाविरूद्ध लसींच्या प्रभावाचं मूल्यांकन केलं जावं. सर्व जनतेला त्वरीत लसीकरण सहभागी करून घ्यायला हवं. पारदर्शक होत उर्वरित जगाला आपल्या निष्कर्षांबद्दल माहिती दिली जावी’ असा सल्लाही राहुल गांधींनी दिला आहे. केंद्र सरकारकडे कोविड विरुद्ध लढण्यासाठी किंवा लसीकरण मोहीम राबवण्यासाठी कोणतीही स्पष्ट रणनीती नसल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. महामारीवर विजय मिळवण्याची घोषणा केंद्र सरकारकडून केली जात होती तेव्हा व्हायरस आणखीनंच तेजीनं फैलावत होता, असंही त्यांनी म्हटलंय.
राहुल गांधी यांनी पत्र लिहिण्यापूर्वी सकाळी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. “सेंट्रल व्हिस्टा हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय आहे. लोकांच्या जीवनाचा प्रश्न असताना नवं घर मिळवण्यासाठी आंधळा अहंकार नको”, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदी सरकारला मारला आहे.