मुंबई (वृत्तसंस्था) केंद्र सरकारपाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावरुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकारचा हा निर्णय म्हणजे उंटाच्या तोंडात जिरे, अशा शब्दांत त्यांनी सरकारला फटकारलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “इंधन दर कपात करताना केंद्र सरकारने २,२०,००० कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला आहे. असं असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती. देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा १५ टक्के आहे. इंधन दर कपातीत राज्य सरकारने किमान १० टक्के तरी भार घ्यायचा होता. पण नाही! याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे’!
“अन्य राज्य सरकारे ७ ते १० रुपये दिलासा देत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याने १.५ आणि २ रुपये दर कमी करणे, ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर बरे झाले असते,” असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.