जळगाव, दि. प्रतिनिधी – ३० जुलै २०२५: देशातील इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरलेली मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० गेमचेंजर ठरणार असून शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासोबतच क्रॉस सबसिडीचा बोजा कमी होऊन उद्योगांच्या दरात आणखी कपात होईल. मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या योजनेतून जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे पुढील एक वर्षात १६ हजार मेगावॅट विजेचा शेतीला दिवसा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी मंगळवारी (दि. २९) दिली.
भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथे मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० अंतर्गत ८ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन श्री. लोकेश चंद्र यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे, संचालक (संचालन/प्रकल्प) श्री. सचिन तालेवार, कार्यकारी संचालक श्री. प्रसाद रेशमे (प्रकल्प), सौर कंपनीचे सल्लागार श्री. श्रीकांत जलतारे, मुख्य अभियंता श्री. इब्राहिम मुलाणी (जळगाव) यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.०चे विविध फायदे पाहता ही योजना गेमचेंजर ठरत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्यासह वीज खरेदीचे दर किफायतशीर राहणार आहे. त्यामुळे क्रॉस सबसिडीचा बोजा कमी होऊन प्रामुख्याने उद्योगांचे वीज दर आणखी कमी होतील. या योजनेमुळे राज्यात ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ग्रामीण भागात सुमारे ७० हजार नवीन रोजगार निर्माण होत आहे.
या योजनेचा अभ्यास व अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, राज्यस्थान या राज्यांतील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी येत आहेत. गेल्या अडीच वर्षांमध्ये सौर ऊर्जेमध्ये झालेल्या कामगिरीच्या आधारे महावितरणकडून प्रथमच वीज दरांमध्ये कपात होऊ शकली. यासोबतच सौर ऊर्जेवर आधारित बॅटरी स्टोरेज करार करण्यात येत असून जास्त मागणीच्या कालावधीत या सौर विजेचा वापर करण्यात येईल असे श्री. लोकेश चंद्र यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात ८५० मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून १५३ उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठा होणार आहे. आतापर्यंत ६८ मेगावॅट क्षमतेचे ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. वेल्हाळे (ता. भुसावळ) येथील ८ मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पातून परिसरातील वेल्हाळे, साकरी, शिंदी, खंडाळा, मोंढाळा, मानमोडी, सुरवाडा (खु.), सुरवाडा (बु.), विचवा, किन्ही व फेकरी या ११ गावांतील १६०९ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुवरठा मिळत आहे.
नहाटा उपकेंद्रातील १० एमव्हीए पॉवर ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन – सुधारित वितरण क्षेत्र योजने अंतर्गत भुसावळ शहरातील ३३/११ केव्ही नहाटा उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्याहस्ते झाले. या उपकेंद्राची क्षमता यापूर्वी १० अधिक ५ अशी एकूण १५ एमव्हीए एवढी होती. नहाटा उपकेंद्रात असलेल्या ५ एमव्हीएच्या जागी १० एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला. त्यामुळे या उपकेंद्राची क्षमता आता १५ एमव्हीएवरून २० एमव्हीए झाली आहे. या क्षमतावाढीमुळे परिसरातील २२ हजार वीजग्राहकांना आणखी सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा होणार आहे. श्री. लोकेश चंद्र यांनी या उपकेंद्राची पाहणी केली व माहिती घेत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता श्री. मनोज विश्वासे (पायाभूत आराखडा), श्री. विनोद पाटील (जळगाव), श्री. मोहन काळोगे (स्थापत्य) यांची उपस्थिती होती.
फोटो ओळ: वेल्हाळे (ता. भुसावळ) येथे ८ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र, सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे, संचालक श्री. सचिन तालेवार व इतर मान्यवर.