नांदेड (वृत्तसंस्था) नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर हे विजयी झाले आहेत. अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांचा तब्बल ४१ हजार ९३३ मतांनी पराभव केला आहे.
नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी पार पडली आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत ६४.९५ % इतकं मतदान झालं होतं. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर देगलूरमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. असं असलं तरी ३ पक्षात प्रामुख्याने ही लढत झाली. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कारण संपूर्ण महिनाभर मंत्री अशोक चव्हाण देगलूर बिलोलीमध्ये तळ ठोकून होते. तर भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
अनुसुचित जातीसाठी आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर, भाजपचे उमेदवार सुभाष साबणे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम रामराव इंगोले निवडणूक रिंगणात होते.