मुंबई (वृत्तसंस्था) माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर चपला आणि बांगड्या भिरकावल्याची घटना घडली. या चप्पल फेकीच्या घटनेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. असे फालतू लोकं, चिल्लर लोकं असतातच, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांना फटकारले.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूर्णानगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने उभारलेल्या उद्यानाचे उद्घाटन होणार होते. त्याचवेळी भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादीने उद्यानाच्या समोरच झेंडे, काळ्या भीती दाखवून भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेतला. फडणवीस कार्यक्रमस्थळी आल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर गर्दीमधून फडणवीसांच्या गाडीवर चप्पल फेकण्यात आली. मात्र चप्पल फेकणारी व्यक्ती कोण होती हे समोर आलं नाही. भाजपा कार्यकर्त्यांकडून मोदींचा नारा दिल्यानंतर राष्ट्रवादीकडून मोदींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला.
दरम्यान कार्यक्रमस्थळी प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, “स्वत: काही करायचं नाही. आपल्या कार्यकाळात ते काहीच करु शकले नाहीत आणि आमच्या नगरसेवकांनी, महापौर, पदाधिकाऱ्यांनी एवढं चांगलं काम करुन दाखवलं याबद्दल त्यांच्या मनात असुया आहे. ही असुया या कार्यक्रमातून दिसते. पण मला एका गोष्टीचं अतिशय दु:ख आहे ते म्हणजे मराठा आरक्षणासाठी ज्या अण्णाबासाहेब पाटलांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि जीव दिला त्यांच्या पुतळ्याच्या उद्धाघटनाच्या कार्यक्रमाला विरोध करण्याचं काम होत असेल किंवा अटलजींना विरोध होत असेल तर यांची बुद्धी तपासून पाहिली पाहिजे”. यावेळी त्यांना गाडीवर चप्पल भिरकावण्यासंबंधी विचारलं असता त्यांनी मला माहिती नाही, कोणीतरी फालतू लोक असतील असा टोला त्यांनी लगावला.