जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा मोटर ड्रायव्हींग स्कुल संचालकांचा पहिला मेळावा श्री क्षेत्र पद्मलाय ता.एरंडोल येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा मोटर ड्रायव्हींग स्कुलचे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून धुळे-नंदुरबारचे अध्यक्ष सुनील चौधरी, टॅक्सी युनियनचे रज्जाक भाई उपस्थित होते. दरम्यान, यावेळी जिल्हा मोटार ड्रायव्हिंग ओनर्स असोसिएशन स्वतःचे ड्रायव्हिंग टेस्टिंग ट्रॅक बनविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
या मेळाव्यात महत्वपूर्ण ठराव करण्यात आले. जळगाव जिल्हा मोटार ड्रायव्हिंग ओनर्स असोसिएशन स्वतःचे ड्रायव्हिंग टेस्टिंग ट्रॅक बनविणार, १०० की.मी. ड्रायव्हिंग ट्रेनिंगचे शुल्क रु.५०००/ कालावधी वीस दिवस (लायसन्स शुल्क अतिरिक्त), २०० की.मी. ड्रायव्हिंग ट्रेनिंगचे शुल्क रु.१००००/कालावधी २० दिवस लायसन्ससह, सर्व ड्रायव्हींग स्कुल या आधुनिक केल्या जातील. संचालकांच्या अडीअडचणीत असोसिएशन एक जूट होऊन काम करेल, असे अँड. जमील देशपांडे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान असोसिएशनचा विस्तार करण्यात आला असून विभागीय अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात बाळा चौधरी (भुसावळ-यावल), सागर मालपूरे (पारोळा, धरणगाव, एरंडोल), प्रवीण पाटील (अमळनेर-चोपडा), आशिष खलाने (चाळीसगाव), असिफ सय्यद (जळगाव शहर), विशाल पाटील (पाचोरा), रईस मिर्झा (भडगाव), उल्हास नेमाडे (रावेर मुक्ताईनगर) मेळाव्यात सचिव किरण अडकमोल यांनी प्रास्तविक केले. जिल्ह्यातील सर्व ड्रायव्हींग स्कुलचे संचालक सहभागी होते. सुनील पाटील संचालक साई गजानन मोटर ड्रायव्हींग स्कूल यांच्यातर्फे खान्देशी डाळ बट्टी, मिर्ची भाजी, वांगे भाजी, गुळाचा शिरा अशा भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.