धुळे (प्रतिनिधी) मराठा आरक्षणाच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला. यात अनपेक्षित असे काहीही नव्हते. भाजपचा शहा आणि शहनशहानी एक हाती सत्ता मिळविल्यानंतर असंख्य प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांवर नामांकित वकिलांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत. पण न्यायालयाबाहेरील काही शक्ती अप्रत्यक्षरित्या न्यायालयीन निकालावर परिणाम करीत असतातच. परंतू फडणवीस आरक्षणाबद्दल संघ विचारसरणीच्या विरुध्द घेत असलेली भूमिका संघाच्या शिस्तीत बसते का ?, असा सवाल धुळ्याचे माजी आ. अनिल अण्णा गोटे यांनी विचारला आहे.
धुळ्याचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या म्हंटले आहे की, मराठा आरक्षणाच्या निकालनंतर पडद्याच्या मागे अनेक बऱ्याच हालचाली झाल्या. त्यातच देवेंद्र फडणवीसांचे नागपूरातील सरस्वती विद्यालयातील सहअध्यायी डॉ. अनुप मरार यांच्या प्रेरणेने व पुढाकाराने सेव मेरीट, सेव नेशन फाऊंडेशन ट्रस्टची स्थापना करण्यात आली. भाजपाच्या डॉक्टर आघाडी सेलचे विदर्भाचे समन्वयक हे सेव मेरीट सेव नेशन फाऊंडेशनचे मुख्य ट्रस्टीही आहेत. सेव मेरीट सेव नेशन फाऊंडेशन ट्रस्टची नागपूर धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी झाल्यानंतर सदर नव्याने स्थापन झालेल्या या संस्थेच्या खजिन्यात देणग्यांचा ओघ सुरु झाला. मराठा आरक्षणाविरुध्द विदर्भ पातळीवर काढलेल्या मोर्चाचे आयोजक सेव मेरीट सेव नेशन फाऊंडेशन ट्रस्टचे ट्रस्टी कर्ते करविते होते.
सेव मेरीट सेव नेशन फाऊंडेशनच्या ट्रस्टीपैकी श्रीमती रुचिता कुलकर्णी, मधुश्री जेथलिया, देवेंद्र जैन यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या तीन याचिका तातडीने दाखल करण्यात आल्या. मा. सर्वोच्च न्यायालयात सिनियर काऊन्सिल म्हणून मान्यता असलेले अॅड. अरविंद दातार यांना वकिलपत्र देण्यात आले. बाकीचे रसद माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सौजन्याने मिळत होते. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयीन लढाईला लागणारा प्रचंड अर्थपुरवठा तसेच १०२ वी घटना दुरुस्ती इंदिरा सहानी जर्नलसिंग सारख्या केसेसमधील बारकावे तसेच राज्यातील मराठा लोकप्रतिनीधींची संख्या, नोकरदारांमध्ये प्रत्येक श्रेणीप्रमाणे जातीच्या आधारावर केलेली व आज शासनाच्या वेगवेगळ्या विभागात असलेल्या नोकरदार वर्गाची आकडेवारी गुप्तपणे आरक्षण विभागाकडे पोहचविल्या जात होत्या. मराठा आरक्षणाच्या विरुध्द असंख्य नकारात्मक बाबी विरोधकांकडे गुप्तपणे पोहचत होत्या. अर्थात, संघ व भाजपाची कार्यपध्दती मला परिचयाची असल्यामुळे यात आश्चर्य वाटावे असे काहीही नाही. संघ भाजपामधील कुजबूज व रणनितीशी मी चिरपरिचित आहे.
संघ भाजपाच्यावतीने नागपूरमध्ये ऑरेंज सिटी हॉस्पीटल चालविले जाते. सदर हॉस्पीटलच्या विश्वस्त मंडळावर (ट्रस्टी) सेव मेरीट सेव नेशन ट्रस्टचे तीन-चार ट्रस्टी आहेत. अर्थात योगायोग ! जलयुक्त शिवाराची वेबसाईट बनविणाऱ्या कंपनीनेच सेव मेरीट सेव नेशनची वेबसाईट तयार केली आहे. घटना दुरुस्तीचे कलम ३७०, सी. ए.ए., एन. आर. सी. या कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या मोर्चाचे सर्व नियोजन सेव मेरीट सेव नेशन फाऊंडेशनची प्रेरणा आहे. हा ही योगायोगच! भाजप व संघाच्या एकत्रित मेळाव्याला सेव मेरीट सेव नेशन ट्रस्टचे बहुतेक ट्रस्टी उपस्थित असतात. हा योगायोगच! देवेंद्र फडणवीसांच्या ऑनलाईन मिटिंगांना डॉ अनुप मुरार उपस्थित असतात. हा ही योगायोगच! अशाच योगायोगाने सेव मेरीट सेव नेशनचे मुख्य ट्रस्टी डॉ. अनुप मुरार व देवेंद्र फडणवीसांच्या कायम बैठका होत असतात. तसेच सेव मेरीट सेव नेशनच्या सात ट्रस्टीपैकी भाजपाच्या विदर्भ डॉक्टर सेलचे समन्वयक डॉ. अनुप मुरार यांचाच पत्ता व अधिकार योगायोगाने देण्यात आला आहे आणि तरीही मा. सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाचा निकाल आरक्षणाच्या विरुध्द लागला. यात पंधरा महिन्यापूर्वी सत्तेत आलेली महाविकास आघाडीच दोषी आहे. हे लोकांच्या मनावर बिंबविण्याकरिता देवेंद्र फडणवीस व त्यांच्या वर्षा नाईट क्लबच्या सभासदांची आदळआपट केविलवाणी वाटते. ओठात एक आणि पोटात एक असे दुतोंडी मांडुळाचे राजकारण ही तर फडणवीसांची खासियत आहे!
देवेंद्र फडणवीसांच्या पाताळयंत्री विश्वास घातकी, कारस्थानी कपटी स्वभावाप्रमाणे मराठा आरक्षणाचा प्रश्न धनगर आरक्षणाप्रमाणे कमिटीची स्थापना, अहवाल या घोळात मराठ्यांना अडविण्याचा त्यांचा डाव जागृत मराठा नेतृत्वाने उधळून लावला. मराठ्यांच्या डोळ्यासमोरच धनगर समाजाचा कसा घात केला हे घडत होते. तेव्हा ते सावध होते. मी स्वतः तर संघ व्यवस्थेतूनच इतपर्यंत पोहचलो आहे. गेल्या अर्ध शतकापेक्षा जास्त काळ मी या संघ विचारसरणीच्या कळपातच काढला असल्यामुळे मी यांची नसन्नस जाणून आहे. खेळाच्या अमिषाने संघस्थानावर आणलेल्या शिशु व बाल स्वयंसेवकाचा मेंदू ताब्यात घेण्याचे काम फार बेमालूमपणे केले जाते. नव्हे तर असे बालकडू काही समज येण्याच्या पूर्वीच डोक्यात घातल्या जातात. संघस्थानावर कधीही महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, त्यागमूर्ती लालबहादूर शास्त्री, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादी एकाही नेत्यांचा दुरान्वये उल्लेखसुध्दा केला जात नाही. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरे करणे तर कोसो दूर आहे. बालमनावर जन्माच्या अपघाताने मिळालेल्या जातीधर्मामधील मागासलेपणाचा किंवा यातून बाहेर पडण्यासाठी करावयाच्या संघर्षाचा दूरान्वयाने उल्लेख सुध्दा केला जात नाही. दलितांना आरक्षण दिल्यामुळे किंवा आरक्षण व्यवस्थेमुळे समाजातील मेरीट असलेल्यांची संधी डावलली जाते. आणि त्यामुळे राष्ट्राची हानी होते असेच ठसविले जाते. ही विचारसरणी स्विकारलेल्या देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांना आरक्षण मिळावे असे वाटण्याचे काहीही कारण नाही. देवेंद्र फडणवीसांनी जर आरक्षणाची भूमिका स्विकारली असेल तर त्यांनी उघड-उघड संघ विचारसरणीशी प्रतारणा केली असाच त्याचा अर्थ होईल. जे बोलायचे ते करायचे नाही आणि जे करायचे ते कोणाला कळू द्यायचे नाही! संबंध आयुष्य पुतणा मावशीच्या भूमिकेत पार पाडणे हा तर त्यांचा स्थायीभाव आहे. विचारांच्या या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणीसांनी खुलासा करावा की,” असे तो हिमाचन हिंदू राष्ट्र” आणि संघाची असलेली आरक्षणाबाबतची भूमिका ही खरी की आरक्षणाला विरोध करुनही पुन्हा तुम्ही ढाळत असलेली पुतणा मावशीचे अश्रू खरे! मराठा आरक्षणावर भाजपाच्या दुटप्पी भूमिकेची चिरफाड करणारे पत्रक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.